Political News राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला परप्रांतीयांचा मुद्दा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Political News राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला परप्रांतीयांचा मुद्दा

Share This

मुंबई - आगामी काळात होणा-या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच मुंबईमधील बड्या कंपन्यांकडून महापालिकेने कर वसूल करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे हे मैदानात उतरले असून विविध समस्यांबाबत त्यांनी विचारणा केली.

मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची राज ठाकरे यांनी आज भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी दोन मागण्यांचे पत्र आयुक्तांना दिले. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये रुग्णांची मोठी गर्दी असते. पालिका रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर परप्रांतिय नागरिक उपचारासाठी येत असतात. महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या उपचारासाठी उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात परप्रांतिय नागरिक उपचार घेतात. रहिवासी पुराव्याच्या आधारे स्थानिक रुग्णांना उपचारात प्राधान्य द्यावे अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. याद्वारे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित केला आहे. 

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जमिनीखालून मोठ्या प्रमाणात केबल जातात. या केबल अदानी, अंबानी किंवा रिलायन्स, एअरटेल अशा कोणत्याही कंपनीच्या असू शकतात. जमिनीखालून जाणा-या केबल कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कर वसूल झाल्यास महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. या कंपन्या धर्मदाय कंपन्या नाहीत. त्या मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहेत. त्यामुळे या कंपन्यांकडून कर वसूल केला जाऊ शकतो. या सर्व केबलच्या संदर्भात महानगरपालिका कर का वसूल करत नाही? असा प्रश्न आपण आयुक्तांना विचारला. या संदर्भात राज्य सरकारने काही निर्णय घेतला असल्याचे देखील आयुक्तांनी आम्हाला कळवल्याचे राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages