
कोल्हापूर - ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले असून पुढील दोन महिन्यांत निवडणूक होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोल्हापुरातील कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची संघटन पर्व कार्यशाळा पार पडली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढील दोन महिन्यात म्हणजे एप्रिल-मे महिन्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता वर्तवताना पुणे महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर भाजप आतापासूनच कामाला लागली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून घेण्यावर भर देण्यात येत आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
या मेळाव्याला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment