कर्करोग नियंत्रणासाठी राज्यभरात महिला आरोग्य तपासणी मोहीम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कर्करोग नियंत्रणासाठी राज्यभरात महिला आरोग्य तपासणी मोहीम

Share This


मुंबई - जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून राज्यातल्या अडीच कोटी महिलांच्या आरोग्य तपासणीची मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी 43 हजार 435 आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून त्यापैकी 1252 शिबिरे झाली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य चित्रा वाघ यांनी महिलांमधील सर्वाधिक प्रमाणावर निदान होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या आणि स्तनांच्या कर्करोगावर करावयाच्या उपाययोजना याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री आबिटकर बोलत होते. या चर्चेमध्ये विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य उमा खापरे, मनीषा कायंदे, प्रज्ञा सातव यांनी सहभाग घेतला.

महिलांना मोफत चांगल्या दर्जाच्या सॅनिटरी पॅडचे वाटप करणे, स्वच्छ स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे, मोफत लस उपलब्ध करू देणे आणि कर्करोगाविषयी जनजागृती करण्याच्या मागण्या करण्यात आल्या.

राज्यातील अडीच कोटी महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी महत्वपूर्ण मोहीम राबवली जात असल्याचे सांगून आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले की, आतापर्यंत झालेल्या शिबिरांमध्ये 21 लाख 48 हजार 435 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 65 हजार 667 महिला संशयित तर 892 महिलांना कर्करोगाचे निदान झाले आहे. त्यांना पुढील उपचार उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. सर्वत्र मॅमोग्राफी तपासणीचे काम सुरू आहे. कर्करोगाच्या लवकर निदानासाठी त्याचा उपयोग होत आहे. लवकर निदान झाल्यास या आजारावर उपचारासाठी चांगला फायदा होत आहे. राज्यातील 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींना लसीकरणाचे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीचा समन्वयाने वापर करण्यात येईल. विशेषतः दारिद्य्र रेषेखालील महिला आणि मुलींना हे लसीकरण मोफत करण्यात येणार आहे. राज्यातील मुलींच्या भविष्याच्या दृष्टीने कर्करोग नियंत्रण महत्वाचे असल्याने शासन याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असेही आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages