
मुंबई - पावसाळ्यात मुंबईत झाडे आणि फांद्या पडून नागरिकांचा मृत्यू होतो. जीवित आणि वित्तहानीही होते. यावर उपाय म्हणून खासगी जागेतील झाडांची छाटणी महापालिकेने करावी अशी मागणी मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केली होती. पालिकेने ही मागणी मान्य केल्याने मुंबईमधील नागरिकांना आणि सोसायट्यांना दिलासा मिळाला आहे.
पावसाळ्यात झाडे पडून निष्पाप नागरिकांचे बळी जातात. यामध्ये अशी एक बाब समोर आली आहे की, खाजगी जागेवरील जी झाडे आहेत त्यांची छाटणी पालिका करीत नाही. ही झाडे खाजगी जागेवर जरी असली तरी त्याच्या फांद्या रस्त्यावर असतात व त्या कोसळून अपघात होतात. झाडांची छाटणी करण्यासाठी पालिका सदर खाजगी जागा मालकाकडून अथवा सोसायटीकडून शुल्क आकारते. ते जास्त आहे. जर खाजगी मालकाने अथवा संस्था, सोसायटीने शुल्क दिले नाही तर छाटणी होत नाही.
त्यामुळे यापुढे पालिकेने पुढाकार घेऊन जी झाडे खाजगी जागेत जरी असली तरी ज्यांच्या फांद्या धोकादायक झाल्या आहेत अशा झाडांची छाटणी पालिकेने मोफत करावी, अशी मागणी मंत्री एँड आशिष शेलार यांनी काल पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली होती. त्यानुसार याबाबत तातडीने कार्यपद्धती निश्चित करणारे परिपत्रक काढून आयुक्तांनी महापालिका यापुढे खाजगी जागेवरील झाडांची आपल्या खर्चातून करेल, असे निश्चित केले.
No comments:
Post a Comment