
मुंबई - मंगळवार, दिनांक २० मे २०२५ रोजी महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिलांकडून भारतीय सैन्याच्या शौर्याला मान वंदना देण्यासाठी 'सिंदूर यात्रा' आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ४:३० वाजता गावदेवी, मुंबई येथील मणी भवन येथून सदर यात्रेचा प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व वीरमाता अनुराधा ताई गोरे व डॉ. मंजू लोढा करणार आहेत. यात्रेत १५०० हून अधिक महिला सहभागी होणार असून, यात शाहिद सैनिकांच्या पत्नी, त्यांचे कुटुंबीय, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्त्या, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि इतर मान्यवर देखील उपस्थित असणार आहेत.
ही यात्रा भारतीय लष्कराने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या दहशतवाद विरोधी मोहिमेला समर्पित आहे. पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर अचूक कारवाई केली होती. याच शौर्याच्या स्मरणार्थ आणि समर्थनार्थ महिलांनी एकत्र येत ‘सिंदूर यात्रा’ साकारली आहे. सिंदूर यात्रा हे केवळ श्रद्धांजलीचे नव्हे, तर महिलांचे राष्ट्रप्रेम, सामाजिक जाणीव आणि सैन्याबद्दलच्या कृतज्ञतेचा एक सशक्त संदेश आहे. हा उपक्रम मुंबईकरांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. कार्यक्रमाच्या समारोपाला राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित राहणार असून प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून मानवंदना देतील.
No comments:
Post a Comment