डंपिंग ग्राउंडचा कचरा बायो रेमिडिएयशन प्रकल्पाद्वारे हटविण्याच्या निर्णयाचे स्वागत - आमदार रईस शेख - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 May 2025

डंपिंग ग्राउंडचा कचरा बायो रेमिडिएयशन प्रकल्पाद्वारे हटविण्याच्या निर्णयाचे स्वागत - आमदार रईस शेख


मुंबई - देवनार डंपिंग ग्राउंडवरील शास्त्रोक्त प्रक्रिया करून कचरा हटविण्यासाठी बीएमसीने निविदा मागवल्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार आणि बीएमसीचे माजी गटनेते रईस शेख यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून ही गोवंडी रहिवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी होती असे त्यांनी म्हटले आहे. 

गोवंडीचे माजी नगरसेवक राहिलेले आमदार रईस शेख म्हणाले की, डंपिंग ग्राउंडमुळे रहिवाशांना अनेक दशकांपासून भयंकर त्रास सहन करावा लागला आहे आणि आता त्यांना हा कचरा काढून टाकल्यानंतर पुनर्प्राप्त केलेल्या जागेवर रुग्णालये आणि शाळा यासारख्या आवश्यक सामाजिक पायाभूत सुविधा मिळायला हव्यात.

गोवंडीतील रहिवाशांची ही अनेक दशकांपासूनची प्रमुख आणि प्रलंबित मागणी होती. त्यांच्यासाठी हे एक स्वागतार्ह पाऊल आहे. डंपिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून बंद केले पाहिजे आणि संपूर्ण प्रक्रियेत महापालिका प्रशासनाने पारदर्शकता राखली पाहिजे, असे आमदार रईस शेख म्हणाले.

आमदार शेख यांनी पुढे असेही म्हटले की, कचरा हटविण्याच्या प्रक्रियेदरम्यान सर्व संबंधितांना महापालिकेने विश्वासात घेतले पाहिजे. गोवंडीतील रहिवाशांना कचरा वाहतूक करताना कमीत कमी गैरसोय होईल याची खात्री केली पाहिजे, कारण दररोज हजारो ट्रक या परिसरातून ये-जा करतील, असेही शेख म्हणाले. 

गोवंडी हे क्षयरोग (टीबी), कर्करोग आणि इतर श्वसन रोगांचे केंद्र असून आमदार रईस शेख म्हणाले, शहराची क्षयरोग आणि कुपोषणाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोवंडीचा सामाजिक-आर्थिक विकास निर्देशक हा सातत्याने सरासरीपेक्षा खूपच खाली राहिला आहे. रहिवाशांना अनेक दशकांपासून त्रास सहन करावा लागत आहे. म्हणूनच, कचरा काढून टाकल्यानंतर पुनर्प्राप्त केलेल्या जमिनीवर त्यांच्यासाठी रुग्णालये आणि शाळा यासारख्या सामाजिक पायाभूत सुविधा विकसित केल्या पाहिजेत, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS