
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तळ कोकणात आलेला मान्सून २४ तासांहून कमी वेळात मुंबईत धडकला. त्यामळे १६ दिवसा आधीच मान्सून मुंबईत दाखल झाल्याने एक विक्रम केला आहे. मुंबईत पहाटेपासून पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, मुंबईत याआधी मान्सून लवकर येण्याचा मागील विक्रम हा २९ मे होता. १९५६, ६२ आणि १९७१ या वर्षात नोंदवला गेला होता.
मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, महापालिका क्षेत्रात रविवारी (२५ मे) ते सोमवारी (२६ मे) रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत नरिमन पॉइंट परिसरात तब्बल २५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच, मुंबईत आतापर्यंत मे महिन्यात एकूण २९४ मिमी पाऊस पडला आहे. तेच १०७ वर्षांपूर्वी म्हणजेच १९१८ साली मे महिन्यात २७९ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर, मुंबईत सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांत १३५ मिमी पावसाची नोंद झाली होती. पावसामुळे हिंदमाता, सायन, मंत्रालय, मिलन सबवे आदी सखल भागात पाणी साचले. पालिकेने पाणी उपसा करणाऱ्या पंपाद्वारे या पाण्याचा निचरा केला.
मुंबई उपनगरात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. कर्जत, खोपोली आणि बदलापूर येथून मुंबईकडे येणाऱ्या लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या, तर मुंबईहून कल्याण व कर्जतकडे जाणाऱ्या गाड्यांनाही १० ते १५ मिनिटांचा विलंब झाला. पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांची वाहतूक मंदावली आहे. कमी दृश्यमानतेमुळे रस्त्यावरची वाहतूक संथ झाली असून, कामावर जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला.
भुयारी मेट्रो स्थानकात पाणी -
पहिल्याच पावसाने मेट्रोच्या विकासाचं पितळ उघडं पाडल्याचे पाहायला मिळत आहे.मुंबईतील पावसाचा मेट्रो-3 प्रकल्पाला फटका बसला असून मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले. मुसळधार पावसामुळे पाणी साचल्यानंतर मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. भुयारी मेट्रोकडे जाणारे गेटही बंद करण्यात आले. पावसाळ्याच्यास्थितीसाठी मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रोस सुरक्षित आणि निर्धोक बनवण्यात आल्याच्या सर्व दाव्यांची पोलखोल या पावसाने केली आहे. कुलाबा ते सीप्झ मेट्रो तीनचा पहिला टप्पा बीकेसी ते आरे कॉलनी सुरु झाल्यानंतर दुसरा टप्पा भाग १ बीकेसी ते वरळीतील आचार्य अत्रे चौक स्थानकात पाणी शिरल्याने यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.
मेट्रो-3 चे स्पष्टीकरण -
मुसळधार पावसाने आचार्य अत्रे चौक स्थानकानजीकची एक संरक्षक भींत कोसळ -ल्याने भुयारी स्थानकात पाणी शिरल्याची घटना घडली आहे. मात्र एक बाब लक्षात घेतली पाहिजे, या स्थानकाचे अद्याप काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जेथून हे पाणी शिरले तो मार्ग आगमन वा प्रस्थानासाठी वापरण्यात येत नव्हता. तेथे कायमस्वरुपी काम अद्याप पूर्ण झालेले नाही. (हे कायमस्वरुपी काम येत्या 3 महिन्यात होईल). मात्र तुर्तास तेथून पाणी येऊ नये म्हणून तात्पुरती संरक्षक भींत उभारण्याचे काम सुरु होते. हे पूर्ण काम 10 जूनपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज होता. मात्र, पाऊस लवकर आला. लगतच्या भागातून पाण्याचा मारा आणि मुसळधार पावसाने यामुळे ती पडली. खबरदारीचा उपाय म्हणून वरळी ते आचार्य अत्रे चौक येथील मेट्रो वाहतूक तात्पुरती थांबविण्यात आली आहे. आरे जेव्हीएलआर ते वरळीपर्यंतची भुयारी मेट्रो वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. मेट्रो-3 चे अभियंते आणि सुरक्षा चमू यावर युद्धपातळीवर काम करीत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
No comments:
Post a Comment