पदविका आता चार फेऱ्यांमध्ये - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 May 2025

पदविका आता चार फेऱ्यांमध्ये

 

मुंबई - अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, वास्तुकला पदविका आणि बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी पदविका, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी पदविका आणि औषधनिर्माणशास्त्र पदविका (डिप्लोमा इन फार्मसी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या आता तीनऐवजी चार प्रवेश फेऱ्या राबविण्यात येणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून या नव्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना आता चौथ्या फेरीनंतर चांगला पर्याय निवडण्याची संधी उपलब्ध होणार नाही.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारित प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. अभियांत्रिकी पदविका, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका व प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी पदविका, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी पदविका हे अभ्यासक्रम येतात. तर प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. वास्तुकला पदविका अभ्यासक्रम हा वास्तुकला परिषदेच्या अखत्यारित येतो. त्याचप्रमाणे प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. औषधनिर्माणशास्त्र पदविका हा अभ्यासक्रम फार्मसी कौंसिल ऑफ इंडियाच्या अख्यत्यारिमध्ये येतात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये यंदा महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य तांत्रिक पदविका शैक्षणिक संस्था (प्रवेश) नियम, २०१९ या कायद्यांतर्गत घेण्यात आला आहे. त्यानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाकडून यंदा राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहे.

पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या आतापर्यंत तीन फेऱ्या राबवण्यात येत होत्या. मात्र शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून या अभ्यासक्रमांच्या चार फेऱ्या राबविण्यात येणार आहेत. दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या फेरीसाठी पात्र असलेल्या उमेदवाराने भरलेला पर्याय अर्जामध्ये बदल करण्याची सुविधा मिळणार आहे.

मागील फेऱ्यांमध्ये पर्याय अर्ज भरण्यात अयशस्वी ठरलेल्या उमेदवारांना या चौथ्या फेरीमध्ये पर्याय अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. फेरी वाढविण्यात आल्या या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला मिळणार आहे.

फेरीत करण्यात आलेले बदल
एखाद्या उमेदवाराला दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत अनुक्रमे पहिल्या तीन आणि सहा पसंतींनुसार जागा मिळाली असेल, तर जागावाटप आपोआप गोठवण्यात येईल. स्वीकृतीनंतर उमेदवार त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये सहभागी होण्यास पात्र राहणार नाही. अशा उमेदवारांनी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी एआरसीकडे हजर राहून कागदपत्रांची स्वतः छाननी करून ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरावे. त्यानंतर जागा वाटप केलेल्या संस्थेत हजर राहून प्रवेश घ्यायचा आहे. जर उमेदवार एआरसीला हजर झाला नाही किंवा कागदपत्रांची तपासणी करण्यात अयशस्वी ठरल्यास त्याला वाटप केलेल्या जागेवरील त्याचा दावा आपोआप रद्द होऊन ती जागा पुढील प्रवेशासाठी उपलब्ध होणार आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत उमेदवाराला पहिल्या तीन आणि सहा पसंतीक्रमांव्यतिरिक्त जागा मिळाल्यानंतर त्यांनी मिळालेल्या जागेवर प्रवेश घेतल्यास तो पुढील फेरीत सुधारणा करण्यासाठी पात्र राहील.

चौथ्या फेरीनंतर उमेदवाराला पुढील कोणताही सुधारणा पर्याय उपलब्ध राहणार नाही. तसेच कार्यरत व्यावसायिकांसाठी दुसऱ्या फेरीनंतर पुढील कोणताही सुधारणा पर्याय उपलब्ध नसेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS