कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा जनता दरबाराचा नवा आदर्श - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा जनता दरबाराचा नवा आदर्श

Share This

मुंबई, २४ जून : विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकाच छताखाली उपलब्ध राहून, नागरिकांच्या समस्यांचे निरसन करण्याच्या हेतूने थेट प्रशासकीय मदत मिळवून देणारा जनता दरबार आयोजित करून कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या या जनता दरबारात महाराष्ट्रातील सुमारे 500 नागरिकांनी आपले प्रश्न मांडले. 

राज्य सरकारकडून विविध ठिकाणी मंत्र्यांचे जनता दरबार आयोजित केले जातात. मात्र कौशल्य विकास विभाग तसेच मुंबई उपनगर जिल्हा सह पालकमंत्री असलेल्या मंत्री लोढा यांनी जनता दरबाराच्या निमित्ताने विविध 12 विभागाच्या अधिकाऱ्यांना एकत्र आणले. यात मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. रस्ते, पाणी, वीज आणि मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या  अधिकारात असलेल्या जमिनींच्या प्रश्नासंदर्भात ही नागरिकांनी याठिकाणी आपले प्रश्न मांडले. सी पी टँक इथे राहणारे जोतिंद्र आणि मीनाक्षी लोटवाल या  वृध्द दांपत्याने देखील मंत्री लोढा यांचे आभार व्यक्त केले. मागील अनेक दिवस त्यांच्या घराजवळील गतिरोधकाचा प्रश्न सुटत नव्हता. मात्र या जनता दरबारात एकच वेळी मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीएचे अधिकारी उपलब्ध झाल्याने हा प्रश्न निकाली निघाला असल्याचे लोटवाल यांनी सांगितले. तसेच मुलुंड येथे राहणारी क्रिशा कोठारी या विद्यार्थीनीचा उच्च शिक्षणाच्या प्रवेशाचा प्रश्न ही मार्गी लागला असल्याचे जतिन चंदे या नातेवाईकाने सांगितले. 
मंत्री लोढा यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे संयमाने ऐकून घेतले व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले. “जनतेशी थेट संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे. लोकांच्या समस्या केवळ कागदावर न राहता, त्या त्वरित मार्गी लागल्या पाहिजेत, हीच माझी भूमिका आहे,” असे लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचबरोबर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनता दरबारात नागरिकांचा प्रतिसाद पाहून लोढा यांचे अभिनंदन केले. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री लोढा यांनी फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्राचा दौरा करावा असे मत व्यक्त केले. दरम्यान, एकाच वेळी एकाच ठिकाणी विविध विभागातील अधिकारी वर्ग उपलब्ध झाल्यामुळे  समस्या मांडण्यासाठी आलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages