हिंदी सक्ती विरोधात ६ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 June 2025

हिंदी सक्ती विरोधात ६ जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा


मुंबई - शाळेत पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषेच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी ते ६ जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत. गिरगाव चौपाटीवरून या मोर्चाची सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या ६ जुलैला सरकारच्या या निर्णयाविरोधात भव्य मोर्चाची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. या मोर्चात कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, केवळ मराठीचा अजेंडा असेल असे सांगत राज यांनी सर्व राजकीय पक्ष, मराठी कलावंत, साहित्यिक यांना मोर्चात येण्याचे आवाहन केले आहे. त्यात या मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र आल्याचे चित्र महाराष्ट्राला दिसेल अशा प्रकारचे संकेतही राज ठाकरे यांनी दिले आहेत.

येत्या ६ जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे. महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे सरकारला दाखवणार आहोत, असेही ते म्हणाले. राज्यात पहिल्या इयत्तेपासून तिस-या भाषेचे शिक्षण अनिवार्य करतानाच ही भाषा हिंदीच राहील, असे शुद्धिपत्रक राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने मंगळवारी रात्री उशिरा जारी केले. अन्य भाषांच्या शिक्षणासाठी अटींचे अडथळे ठेवतानाच शिक्षण विभागाने अप्रत्यक्षपणे हिंदीची सक्ती केली. त्याविरोधात मनसेने परखड भूमिका जाहीर केली.

याविषयी राज ठाकरे म्हणाले, शिक्षणमंत्री दादा भुसे येऊन गेले. त्यांनी त्यांची भूमिका सांगण्याचा प्रयत्न केला, जी मी संपूर्णपणे फेटाळून लावली. आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितले. पाचवीनंतरच तिस-या भाषेचा विषय येतो. त्यांनी हे मान्य केले की, राष्ट्रीय शिक्षण धोरणात कोणत्याही गोष्टीचा समावेश नाही. राज्यावर टाकलेली गोष्ट आहे. राज्यावर गोष्ट टाकली तर हे का करत आहेत, हे अजूनही अनाकलनीय आहे. सीबीएससी शाळा या नव्याने आल्या. त्या आयएएस अधिका-यांच्या मुलांसाठी काढलेल्या शाळा होत्या. त्या शाळांचा राज्यातील शाळांवर वर्चस्व करण्याचा प्रयत्न आहे. तोच केंद्र आणि आयएएस अधिका-यांचा अजेंडा आहे. महाराष्ट्र हे का करतोय? काही राज्यं करत नाहीत. त्यांच्याकडे काही गोष्टींचे उत्तर नव्हते. तेच तेच म्हणत होते. आमचा या सर्व गोष्टीला विरोध होता, असेल आणि राहणार.

याला कटच म्हणावे लागेल - 
हिंदी भाषासक्तीच्या राज्य सरकारच्या निर्णयाला त्यांनी ‘कट’ असे म्हटले आहे. हा जो कट आहे, याला कटच म्हणेल. महाराष्ट्रातील मराठीपण घालवण्यासाठी हा कट आहे. राजकीय पक्षांव्यतिरिक्त या मोर्चात कोण कोण सहभागी होतात हे मला पाहायचं आहे. कोण येणार नाही हेही मला पाहायचं आहे. नुसतंच तोंडदेखले बाकीचे बोलत असतात. ही महत्त्वाची लढाई आहे.

६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
या मोर्चाबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांनीही हिंदी सक्तीला विरोध केल्याचे सांगत ते या मोर्चात येतील का असे विचारले. पत्रकारांच्या या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटले तर तेदेखील त्यात आले. त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्या नेत्यांशी बोलणार. आमची माणसे त्यांच्या लोकांशी बोलतील. ज्या विधानावरून हे सगळं चाललेय ते विधान तुम्हाला आठवत असेल, कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे लक्षात ठेवा. हे वाक्य तुम्हाला ६ तारखेला कळेल असे राज यांनी म्हटले.

रविवार असल्याने पालक-विद्यार्थ्यांचाही सहभाग
६ जुलै रोजी रविवार आहे जेणेकरून सगळ्यांना येणे सोपे जाईल. महाराष्ट्राची ताकदही त्यातून सरकारला दिसेल. रविवार आहे शाळा बंद असतात, पालकांना-विद्यार्थ्यांना यायला सोपे आहे. त्रिभाषा सूत्र मान्य नाही. पाचवीपासून पुढे पर्याय असू शकतो. आयएएस अधिका-यांच्या मुलांसाठी सीबीएसई शाळा राज्यात आणल्या होत्या. मात्र आता या शाळा राज्यांतील शाळांवर वरचढ होण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरेंचाही सरकारला इशारा
दरम्यान, महाराष्ट्रावर हुकूमशाही लादण्यासाठी शिवसेना संपवली हे दिसून आले. कुठल्याही भाषेचा द्वेष नाही. जे आंदोलन उभे राहील त्यामागे शिवसेना खंबीरपणे उभे राहील. हिंदी भाषेच्या सक्तीला आमचा विरोध आहे आणि राहणारच…हिंदी भाषेला आमचा विरोध नाही. महाराष्ट्रात हिंदी चित्रपटसृष्टी बॉलिवूड उभे राहिले. आम्हाला हिंदीचे वावडे नाही परंतु हिंदी सक्तीमागे छुपा अजेंडा आहे. कालांतराने देशात एकच पक्ष राहील त्यादिशेने ही वाटचाल सुरू आहे. सरकारकडून भाषिक आणीबाणी लादली जातेय, त्याचा विरोध आम्ही करणारच आहोत. बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे गद्दारांना कळायला हवे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS