मुंबई विद्यापीठाचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २ कोटी ७४ लाखांचे अर्थसहाय्य - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 June 2025

मुंबई विद्यापीठाचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २ कोटी ७४ लाखांचे अर्थसहाय्य


मुंबई - मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागात शिकत असणाऱ्या गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने मदतीचा हात पुढे करत रुपये २ कोटी ७४ लाख १६ हजारांचे अर्थसहाय्य केले आहे. 

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध चार योजनांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. यामध्ये पुस्तकपेढी योजनेअंतर्गत १ कोटी ६ लाख १४ हजार ८४० रुपये, आर्थिकदृष्ट्या गरजू आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ६ लाख ३८ हजार रुपये, महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी १ कोटी १ लाख ७३ हजार ५०० रुपये, तर विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागात शिकत असणाऱ्या एस.सी./ एस.टी./ डी.टी./ एन.टी. विद्यार्थ्यांना ६० लाखांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागात शिकत असणाऱ्या गरजू, आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांअतर्गत योजना राबविल्या जातात. पुस्तक पेढी योजनेअंतर्गत संलग्नित महाविद्यालयातील २७ हजार ४७१ आणि शैक्षणिक विभागातील ५७ विद्यार्थ्यांसाठी मदत व अर्थसहाय्य करण्यात आले. या योजनेअंतर्गत एकूण १ कोटी ६ लाख १४ हजार ८४० रुपये विद्यार्थ्यांना देण्यात आले. आर्थिकदृष्ट्या गरजू आणि मागासवर्गीय विद्यार्थी योजनेअंतर्गत महाविद्यालयातील १९८ आणि शैक्षणिक विभागातील २२ विद्यार्थ्यांना ६ लाख ३८ हजार  रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. 

तिसऱ्या योजनेअंतर्गत महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या १,९५० विद्यार्थ्यांना १ कोटी १ लाख ७३ हजार ५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. यामध्ये अर्ज केलेल्या २१ महाविद्यालयातील ११०३ मुले आणि ८४७ मुलींचा समावेश आहे. तर चौथ्या योजनेअंतर्गत विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागात शिकणाऱ्या १२० एस.सी./ एस.टी./ डी.टी./ एन.टी. विद्यार्थ्यांना रुपये ६० लाखांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या चारही योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत स्वतंत्र संकेतस्थळ तयार करून संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. वर्षनिहाय सर्वाधिक २ कोटी ७४ लाखांचे अर्थसहाय्य शैक्षणिक वर्ष २०२४- २५ साठी करण्यात आले आहे. 

वर्षनिहाय वितरीत केलेल्या निधींचा तपशील - 
२०२०-२१  :      १,५७, ८२,०८०
२०२१-२२  :      १,७७,३७,०००
२०२२-२३  :     २,०९,४२,७३८
२०२३-२४ :     २,४२, ३१, ७००
२०२४-२५ :     २,७४,१६,३४०

गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला - 
“मुंबई विद्यापीठात शिकणाऱ्या गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी विद्यापीठाने राबविलेला हा अत्यंत्य स्तूत्य उपक्रम आहे. योजनेनुसार अधिकाधीक विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात येत आहे. विद्यापीठाने नेहमीच गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला असून विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी विद्यापीठ सतत प्रयत्नशील आहे.”
- प्रा. रवींद्र कुलकर्णी, 
कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS