
मुंबई - आषाढी एकादशी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात दाखल होणा-या राज्यातील १ हजार १०९ दिंडयांना राज्य सरकारने प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. सामाजिक न्याय विभागाद्वारे हे अनुदान दिले जाणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मानाच्या १० पालख्यांसोबत येणा-या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर यंदा ६ जुलैच्या आषाढी एकदशीसाठी दिंडयांना २० हजार रुपयांचे अनुदान देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले होते. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. १ हजार १०९ दिंडयांना प्रत्येकी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी २१ लाख ८० हजार रुपये वितरित करण्यास विभागाने मान्यता दिली आहे. पुणे विभागीय आयुक्तांनी अनुदान वितरणाची कारवाई करावी, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment