मशीद बंदर येथील सिंदूर (कर्नाक) उड्डाणपुलाचे १० जुलैला लोकार्पण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मशीद बंदर येथील सिंदूर (कर्नाक) उड्डाणपुलाचे १० जुलैला लोकार्पण

Share This

मुंबई - मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि' मेलो मार्गाला जोडणा-या सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते व उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजितदादा पवार, विधानसभा अध्‍यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत गुरूवार, दिनांक १० जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.  दक्षिण मुंबईतील पूर्व – पश्चिम भागांना जोडणा-या या पुलावरून दोन्‍ही दिशेने वाहतूक सुरू होऊन नागरिकांना सुलभ पर्याय उपलब्‍ध होणार आहे.

राज्‍याचे माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा तसेच स्थानिक खासदार अरविंद सावंत, आमदार सुनिल शिंदे, आमदार राजहंस सिंह, महानगरपालिकाआयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्यासह विविध मान्यवरांची या सोहळ्यास उपस्थिती असणार आहे.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍या नेतृत्‍वाखाली पूल विभागाचे अभियंते यांनी सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) उड्डाणपुलाची उभारणी विहित कालमर्यादेत म्‍हणजेच दिनांक १० जून २०२५ रोजी पूर्ण करण्‍यात आली आहे. दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) पूल महत्त्वाचा आहे. १५० वर्ष जुना कर्नाक पूल धोकादायक झाल्‍याचे मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केले. त्यानंतर मध्‍य रेल्‍वे प्रशासनाने ऑगस्‍ट २०२२ मध्‍ये पुलाचे निष्‍कासन केले. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग (Connectivity) कायम ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाची पुनर्बांधणी केली आहे. मध्‍य रेल्‍वे प्रशासनाने मंजूर केलेल्‍या आराखड्यानुसार सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) पुलाचे बांधकाम करण्‍यात आले आहे. 

या पुलाची एकूण लांबी ३२८ मीटर असून रेल्वेच्या हद्दीत ७० मीटर इतकी आहे. महानगरपालिका ह‌द्दीतील पोहोच रस्‍त्‍याची एकूण लांबी २३० मीटर असून पूर्वेस १३० मीटर व पश्चिमेस १०० मीटर इतकी आहे. लोहमार्गावरील पुलाच्‍या उभारणीकामी आरसीसी (Reinforced Cement Concrete) आधारस्तंभ यावर (Pier) प्रत्येकी ५५० मेट्रिक टन वजनी ७० मीटर लांब, २६.५० मीटर रूंद आणि १०.८ मीटर उंचीच्‍या दोन तुळया (Girder) स्‍थापित करण्‍यात आल्‍या आहेत. आरसीसी डेक स्लॅब, डांबरीकरण, महानगरपालिकेच्या ह‌द्दीतील पूर्व आणि पश्चिम बाजूचे पोहोच रस्ते इत्यादी कामे पूर्ण झाली आहेत. 

या प्रकल्प अंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई दिनांक १९ ऑक्‍टोबर २०२४ रोजी आणि उत्‍तर बाजूची लोखंडी तुळई दिनांक २६ आणि ३० जानेवारी २०२५ रोजी रेल्‍वे भागात सरकविण्‍याची कार्यवाही यशस्‍वीरित्‍या पूर्ण करण्‍यात आली.  मध्य रेल्वे प्रशासनाने वाहतूक व वीज पुरवठा या दोन्ही घटकांमध्ये घेतलेल्या विशेष खंड (स्पेशल ब्लॉक) दरम्यान तुळई सुरक्षितरित्या व यशस्वीपणे सरकवण्यात आली.  ५५० मेट्रिक टन वजनाच्या लोखंडी तुळईची जुळवणी जमिनीपासून ८ ते ९ मीटर उंचीवर पूर्ण करून, रेल्वे भागावर ५८ मीटर अधांतरी सरकविणे, सुमारे २ मीटर उंचीवरुन खाली उतरविणे, आरसीसी आधारस्तंभावर स्थानापन्न करणे अशाप्रकारचे स्थापत्य अभियांत्रिकीदृष्ट्या हे काम अत्यंत आव्हानात्मक, जोखमीचे होते.  त्यासाठी विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले. पूर्वेकडील संपूर्ण काम म्‍हणजेच पायाभरणीपासून ते डांबरीकरणापर्यंतची कार्यवाही अवघ्या ४ महिन्यात पूर्ण करण्यात आली आहे. 

महानगरपालिकेच्या पूल विभागाच्या समन्वयाने सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) पुलाची उभारणी, स्थापत्य कामे व अनुषंगिक कामे पूर्ण झाली आहेत. पुलाची भारक्षमता, स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी भार चाचणी (Load Test) घेण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूचे पोहोच रस्ते (Approach Roads), मार्गिकेवरील कॉंक्रिट, मास्टिक, अपघातरोधक अडथळा (Anti Crash Barriers), रंगकाम आणि मार्गरेषा आखणी आदी सर्व कामे पूर्ण होऊन पूल वाहतुकीसाठी उपलब्‍ध झाला आहे. संरचनात्‍मक स्थिरता प्रमाणपत्र, सुरक्षा प्रमाणपत्र तसेच पूल कार्यान्वित करण्‍यासाठी रेल्‍वे विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र महानगरपालिकेस प्राप्‍त झाले आहे. एकंदरीत, सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) पूल वाहतुकीस खुला करण्‍याकामी सज्‍ज झाला आहे.  

सिंदूर पुलाच्या पुनर्बांधणीचे फायदे -
- मुंबई शहराच्या दक्षिणेतील पी. डि' मेलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ड मार्केट, काळबादेवी, धोबी तलाव ह्या वाणिज्यक भागांना लोहमार्गावरून पूर्व - पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा.
- पुलाच्या पुनर्बांधणीमुळे सुमारे १० वर्षापासून बाधित झालेली पूर्व - पश्चिम वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध होणार.
- पूल कार्यान्वित झाल्यावर पी डि' मेलो मार्ग विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग व शहीद भगतसिंग मार्ग यांच्या छेदनबिंदूवरील (junction) वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत.
- पुलाच्या पुनर्बांधणीने युसुफ मेहरअली मार्ग, मोहम्मद अली मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, काझी सय्यद मार्ग यावरील वाहतूक होणार सुलभ.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages