उज्ज्वल निकम यांची खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उज्ज्वल निकम यांची खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती

Share This

मुंबई - राजकीय क्षेत्रामधून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. २०२४ साली लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची आता राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. निकम यांच्यासह आणखी तीन जणांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

भारताच्या राष्ट्रपतींनी संविधानाच्या कलमांनुसार प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल देवराव निकम, केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मस्ते, भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. यापूर्वी नामांकित सदस्यांच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेल्या रिक्त पदांच्या जागेवर या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारी वकील असलेले उज्जल निकम हे राज्यामध्ये अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वांच्या वकिलांपैकी एक आहे. त्यांना भाजपने लोकसभा निवडणुकीचे तिकीट देत निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले होते. मात्र तिथे त्यांचा पराभव झाला. कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी उज्जवल निकम यांचा पराभव केला. त्यामुळे उज्ज्वल निकम यांचे लोकसभेमध्ये जाण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. यानंतर आता उज्जव निकम यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. राष्ट्रपती नामनिर्देशित कोट्यातून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना स्वतःहून फोन केला.

उज्ज्वल निकम यांनी एका माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधानांनी केलेल्या फोनबाबत माहिती आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मला फोन आला. ते मराठीमध्ये पहिला प्रश्न विचारताना म्हणाले, उज्जवलजी हिंदीत बोलू की मराठी. त्यानंतर त्यांनी माझ्याशी मराठीत संवाद साधला. त्यांनी मला सांगितले की राष्ट्रपती महोदय तुमच्यावर एक जबाबदारी सोपवू इच्छितात आणि ही जबाबदारी देशाच्या दृष्टीकोनातून चांगली सांभाळाल याच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. मी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तमाम भाजप पक्षाने माझ्यावर लोकसभा निवडणुकीवेळी जो विश्वास प्रकट केला होता, तो यावेळी सार्थ करुन दाखवेन,” असे उज्ज्वल निकम म्हणाले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages