
मुंबई - धार्मिक विधींमुळे वाळकेश्वर परिसरातील ऐतिहासिक बाणगंगा तलावात साचलेले निर्माल्य काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सलग तीन दिवस स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत एकूण १० मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले. तसेच तलावातील माशांना पुरेसा प्राणवायू मिळावा यासाठी वायूविजन व्यवस्थेद्वारे सहा पंप लावून तलावातील पाणीही स्वच्छ करण्यात आले. ही संपूर्ण स्वच्छता करण्यासाठी महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱयांनी सलग तीन दिवस परिश्रम घेतले. (10 metric tons of Nirmala extracted from the historic Banganga Lake)
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार ऐतिहासिक बाणगंगा तलावाची स्वच्छता करण्यात आली आहे. उप आयुक्त (परिमंडळ एक) चंदा जाधव यांच्या देखरेखीखाली महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सलग तीन दिवस तलावाची स्वच्छता केली.
वाळकेश्वर परिसरातील ऐतिहासिक बाणगंगा तलावाचे व्यवस्थापन एका खासगी संस्थेकडे आहे. पितृपक्षात मुंबईतील नागरिक बाणगंगा तलावात पिंडदानासाठी एकत्र येतात. या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर नागरिकांनी धार्मिक विधीनंतर पिंडदानाचे साहित्य, निर्माल्य तलावात टाकू नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने करण्यात आले होते. तसेच निर्माल्य आणि पिंडदान याकरिता सोपविण्यासाठी बाणगंगा तलावाजवळच कृत्रिम तलाव उभारला होता. निर्माल्य संकलनासाठी पिंप, कचरा संकलनासाठी कचरा पेट्या ठेवण्यात आल्या होत्या. नागरिकांनी धार्मिक विधीवेळी या कृत्रिम तलावाचा आणि पिंपाचा वापर करावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाकडून वारंवार करण्यात आले होते.
महानगरपालिका प्रशासनाकडून संपूर्ण पितृपक्षात तलावाची नियमितपणे स्वच्छता करण्यात येत होती. दररोज तलावातील निर्माल्य काढण्यात येत होते. दरम्यान, दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वपित्री अमावस्येला मुंबईतील नागरिकांनी पिंडदानासाठी प्रचंड गर्दी केली. तलाव परिसरात कर्तव्यावर हजर असलेल्या महानगरपालिका कर्मचाऱयांनी तलावात निर्माल्य आणि पाने-फुले टाकू नका, असे नागरिकांना आवाहन केले. तसेच कर्मचाऱयांनी तलावाच्या पायऱयांवरील कचराही ताबडतोब उचलून निर्माल्य कलशात एकत्र केला. तरीही काही नागरिकांनी बाणगंगा पिंडदान करून साहित्य सोडले. परिणामी तलावात अस्वच्छता पसरली. कचराही साचला. त्यामुळे महानगरपालिकेचा डी विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाने तलावाची स्वच्छता मोहीम हाती घेतली. रविवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी ६ मेट्रिक टन, सोमवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी २ मेट्रिक टन आणि मंगळवार, दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी २ मेट्रिक टन असे एकूण दहा मेट्रिक टन कचऱयाचे संकलन करण्यात आले. तसेच, संपूर्ण पितृपक्षात तलाव परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी फिरत्या प्रसाधनगृहांची (मोबाईल टॉयलेट) व्यवस्था करण्यात आली होती.
तसेच, तलावातील माशांना जास्तीत जास्त प्राणवायू मिळावा, यासाठी सलग तीन दिवस सहा पंपाद्वारे तलावातील पाणी उपसून पुन्हा तलावात सोडण्यात आले. यामुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण वाढले आहे. तसेच तलावातील माशांनाही आता पुरेशा प्रमाणात प्राणवायू मिळत आहे. नागरिकांनी ऐतिहासिक बाणगंगा तलावाचे महत्त्व ओळखून त्यात निर्माल्य व कचरा टाकू नये. तसेच धार्मिक विधी केल्यानंतर कृत्रिम तलाव, निर्माल्य कलश, कचरा टाकण्यासाठीचे पिंप यांचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Post Top Ad
24 September 2025
Mumbai News ऐतिहासिक बाणगंगा तलावातून १० मेट्रिक टन निर्माल्य काढले
Tags
# महाराष्ट्र
# मुंबई
Share This
About JPN NEWS
मुंबई
Tags:
महाराष्ट्र,
मुंबई
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment