
मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये एका बौद्ध भिक्षू (PhD संशोधक विद्यार्थी) विद्यार्थ्याला (Buddhist Monk Student) मारहाण करण्यात आली. या विद्यार्थ्यावर हल्ला करून त्याचा अपमान केला गेला, तसेच त्याच्याविरोधात खोटी एफआयआर दाखल करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ विद्यार्थी संघटना आणि बौद्ध धर्मियांनी जोरदार निदर्शने करत कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली. (Mumbai University's Kalina Campus)('Buddhist' monk student beaten up at Mumbai University)
मुंबई विद्यापीठात शिक्षण घेणारा बौद्ध भिक्षू गेल्या 28 दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करत होता. या विद्यार्थ्याला केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांना पत्र सादर करायचे होते. मंत्र्यांच्या स्वीय स्वीय सहाय्यकाद्वारे हे पत्र देण्याची त्याला आधीच परवानगी मिळाली होती. या विद्यार्थ्याला पूर्व परवानगी मिळूनही केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांना पत्र सादर करण्याची परवानगी नाकारण्यात आली. या विद्यार्थ्याला ऐनवेळी परवानगी नाकारणे ही भेदभावपूर्ण कृती आहे. एका अल्पसंख्याक बौद्ध भिक्षूचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतकंच नाही तर कुलकुरुंनी मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याला विद्यार्थ्यावर शारीरिक हल्ला करण्याची सूचना केली असा आरोप आंदोलकांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे ही परिस्थिती आणखी चिघळली आणि विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गोंधळ वाढला. विद्यार्थी संघटनांनी आक्रमक होत शुक्रवारी विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलन करून निषेध नोंदवला.
मुंबई विद्यापीठातील हे आंदोलन केवळ कॅम्पसपुरते मर्यादित राहिले नाही. बौद्ध समुदायातील विद्यार्थी, नागरिक आणि विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी या विद्यार्थ्याला पाठिंबा दिला. या प्रकाराच्या निषेधार्थ मुंबई विद्यापीठाचा परिसर काल दिवसभर कुलगुरूंच्या राजीनाम्याच्या घोषणांनी दणाणून गेला. आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने आजी व माजी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, डॉ. प्रसाद कारंडे तसेच मुंबई पोलिस आयुक्त मनीष कलवानिया यांनी आंदोलनातील शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यांनी भन्तेंच्या मागण्यांबाबत तसेच त्यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा रद्द करण्याबाबत व भन्तेंची तक्रार विधिवत नोंदवण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाने २४ तासांची मुदत मागितली आहे.
विद्यापीठ प्रशासनाचे अत्यंत निंदनीय कृत्य -
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री माननीय किरण रिजूजी यांना भेटण्याची परवानगी असतानाही भन्तेंना भेटू न देता, विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्यावर अन्यायकारक मुस्कटदाबी व गळचेपी करून जबरदस्ती केली. इतकेच नव्हे तर त्यांनी परिधान केलेल्या चिवराचा अपमान करून त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात न नेता थेट पोलीस ठाण्यात नेण्यात आले व खोटा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला. त्यांच्या २८ दिवसांच्या दीर्घ आंदोलनाला कमकुवत करण्यासाठी प्रशासनाने त्यांच्या विरोधात चुकीचे वृत्त (नॅरेटिव्ह) पसरवले. हे विद्यापीठाच्या प्रशासनाचे अत्यंत निंदनीय कृत्य आहे." हा प्रकार विद्यापीठाच्या कायद्याचे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) नियमांचे उल्लंघन आहे.
- ॲड. संतोष गांगुर्डे
राज्य सरचिटणीस
मनसे विद्यार्थी सेना
आंदोलकांच्या मागण्या काय?
1. या हल्ल्यासाठी कुलगुरूंना थेट जबाबदार धरून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
2. विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
3. भिक्षू विद्यार्थ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली खोटी एफआयआर तात्काळ मागे घेण्यात यावी.
4. विद्यार्थ्यांच्या, विशेषतः अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांच्या, शांततापूर्ण आंदोलनांच्या आणि शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्याच्या लोकशाही अधिकारांचे संरक्षण करावे.

No comments:
Post a Comment