टपाल विभागाच्या स्पीड पोस्ट दरात बदल, ओटीपी डिलिव्हरी, ऑनलाइन पेमेंटची सुविधा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

टपाल विभागाच्या स्पीड पोस्ट दरात बदल, ओटीपी डिलिव्हरी, ऑनलाइन पेमेंटची सुविधा

Share This

मुंबई - भारतीय टपाल विभागाने इनलॅंड स्पीड पोस्ट दरांमध्ये तर्कसंगत बदल जाहीर केले असून हे नवे दर १ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहेत. टपाल विभागाने ओटीपी-आधारित सुरक्षित वितरण, ऑनलाइन पेमेंट, एसएमएस सूचना, विद्यार्थ्यांसाठी १०% सवलत यांसारख्या नवी सुविधा जाहीर केल्या. २५ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या गॅझेट नोटिफिकेशन (क्र. 4256) द्वारे याची घोषणा करण्यात आली आहे.

स्पीड पोस्टचा इतिहास - 
स्पीड पोस्ट सेवा १ ऑगस्ट १९८६ रोजी सुरू झाली. देशभरातील पत्रे व पार्सल जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहोचविण्याच्या उद्देशाने ही सेवा आणली गेली. सुरुवातीपासूनच ग्राहकांच्या बदलत्या गरजेनुसार सेवा सातत्याने सुधारली गेली असून, आजही ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय टपाल सेवा ठरते.

नवी सुविधा (२०२५ पासून लागू)
* ओटीपी-आधारित सुरक्षित वितरण
* ऑनलाईन पेमेंट सुविधा 
* एसएमएसद्वारे वितरण सूचना
* सोयीस्कर ऑनलाईन बुकिंग सुविधा
* रिअल-टाईम ट्रॅकिंग सेवा
* ग्राहक नोंदणीची सुविधा

मूल्यवर्धित सेवा
* नोंदणी सुविधा (Registration):  प्रत्येक स्पीड पोस्ट वस्तूसाठी ₹५/- + जीएसटी. वस्तू फक्त प्राप्तकर्ता किंवा त्याच्या अधिकृत प्रतिनिधीलाच सुपूर्द.
* ओटीपी डिलिव्हरी सेवा: प्रत्येक वस्तूसाठी ₹५/- + जीएसटी. वितरण कर्मचारी दिलेला ओटीपी पडताळल्यानंतरच वस्तू सुपूर्द.

विशेष सवलती
* विद्यार्थ्यांसाठी स्पीड पोस्ट दरांवर १०% सवलत.
* नवीन मोठ्या ग्राहकांसाठी विशेष ५% सवलत.

या सुधारणा आणि नव्या सुविधा लागू झाल्यानंतर इंडिया पोस्ट अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञान-सक्षम वितरण सेवा बनणार आहे. विश्वासार्हता आणि परवडणारी किंमत या दोन वैशिष्ट्यांमुळे स्पीड पोस्ट खाजगी कुरिअर कंपन्यांना टक्कर देत भारतातील अग्रगण्य वितरण सेवा म्हणून आपले स्थान आणखी मजबूत करेल.

नवीन दर संरचना - 
नवीन दर संरचनेनुसार, ५० ग्रॅमपर्यंतच्या पत्रांसाठी स्थानिक दर १९ रुपये ठेवण्यात आला आहे, तर २०० किलोमीटरपर्यंत अंतरासाठी हा दर ४७ रुपये असेल. २०१ ते ५०० किलोमीटर, ५०१ ते १००० किलोमीटर, १००१ ते २००० किलोमीटर आणि २००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी देखील ५० ग्रॅमपर्यंतच्या पत्राचा दर ४७ रुपये इतकाच असेल.

५१ ते २५० ग्रॅम वजनाच्या पत्रांसाठी स्थानिक दर २४ रुपये, तर २०० किलोमीटरपर्यंत ५९ रुपये, २०१ ते ५०० किलोमीटरसाठी ६३ रुपये, ५०१ ते १००० किलोमीटरसाठी ६८ रुपये, १००१ ते २००० किलोमीटरसाठी ७२ रुपये आणि २००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी ७७ रुपये आकारले जातील.

२५१ ते ५०० ग्रॅम वजनाच्या पत्रांसाठी स्थानिक दर २८ रुपये असेल. २०० किलोमीटरपर्यंतच्या अंतरासाठी ७० रुपये, २०१ ते ५०० किलोमीटरसाठी ७५ रुपये, ५०१ ते १००० किलोमीटरसाठी ८२ रुपये, १००१ ते २००० किलोमीटरसाठी ८६ रुपये, तर २००० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी ९३ रुपये इतका दर लागू करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages