
मुंबई - पर्यावरणपूरक पॅकेजिंगला चालना देत टपाल सेवांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत, डाक विभाग (Department of Posts) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग (IIP) यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.
हा करार पार्सल संचालनालय, डाक विभाग, संचार मंत्रालय आणि वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत असलेल्या IIP यांच्यात झाला. मुंबईत महाराष्ट्र परिमंडळ प्रमुख डाकघरात झालेल्या या सोहळ्यात, डॉ. सुधीर जाखेरे (IPoS), सहाय्यक अधीक्षक महासंचालक (व्यवसाय विकास आणि विपणन), महाराष्ट्र परिमंडळ आणि डॉ. बाबूराव गुडुरी, अतिरिक्त संचालक, IIP यांनी MoU वर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी श्री. मनोज कुमार, संचालक डाक सेवा (मेल्स आणि व्यवसाय विकास), महाराष्ट्र परिमंडळ, मुंबई उपस्थित होते.
या भागीदारीमुळे IIP चा 58 वर्षांचा पॅकेजिंग क्षेत्रातील अनुभव आणि डाक विभागाचे 1.65 लाखांहून अधिक टपाल कार्यालयांचे जाळे एकत्रित करून शाश्वत व नाविन्यपूर्ण पॅकेजिंगसाठी मजबूत चौकट उभारली जाणार आहे. हा उपक्रम सरकारच्या पर्यावरणीय शाश्वततेच्या दृष्टीकोनाला चालना देत असतानाच, टपाल सेवांची सुरक्षा व गुणवत्ता वाढविण्यात मोलाची भूमिका बजावणार आहे.
करारातील प्रमुख बाबी -
इंडिया पोस्टच्या पार्सल सेवांसाठी आधुनिक आणि शाश्वत पॅकेजिंग सोल्यूशन्स उपलब्ध करून देणे. यात विद्यमान सामग्रीला (जसे की करकरीत बॉक्स, कपड्याचे कव्हर) पर्यायी पर्यावरणपूरक, किफायतशीर, टिकाऊ, हलके, शॉकप्रूफ व स्केलेबल साहित्याचा विकास समाविष्ट आहे.
द्रवपदार्थांसाठी हवाई मार्गाने सुरक्षितपणे वाहतूक करता येईल अशी पॅकेजिंग प्रणाली विकसित करणे.
जागतिक पातळीवरील लॉजिस्टिक मानकांच्या तुलनेत डाक विभागाच्या पद्धतींचे मूल्यमापन करणे.
शाश्वत पॅकेजिंग साहित्याच्या किंमती व तांत्रिक मानकांबाबत "प्राइसिंग अॅप्रोच पेपर" तयार करणे.
कर्मचारी वर्गाला शाश्वत पॅकेजिंगविषयी प्रशिक्षण देण्यासाठी व्हिडिओ व ग्राफिक्स स्वरूपातील साहित्य तयार करणे.

No comments:
Post a Comment