
त्र्यंबकेश्वर येथील महाकुंभ मेळ्याच्या आयोजनाच्या बैठकीचे वृत्तांकन करायला गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वच थरातून तीव्र शब्दात निषेध केला जात आहे, रस्तोरस्ती असे पत्रकारांवर गुंडांकडून हल्ले होणार असतील तर कुठे आहे पत्रकार संरक्षण कायदा ? यापुढे पत्रकारांना आपले पत्रकारितेचे काम करतांना जीव मुठीत घेऊन जावे लागेल अशी भीती निर्माण होत आहे ? कधी पोलिसांकडून मारहाण तर कधी गुंडाकडून, निर्भीड पत्रकारिता करावी तरी कशी काय याबद्दल अनेकांच्या मनात भीती निर्माण होतेय?
गेल्या काही वर्षात पत्रकारिता क्षेत्राची पूर्णपणे वाताहत होत गेली. या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना किंवा त्यांच्या जीवाला कधीच सुरक्षा मिळाली नाही. पत्रकारांचे जीवनमान उंचावण्या संदर्भात किंवा त्यांचे संरक्षणासाठी सरकारने ठामपणे पाऊल उचलले नाही, त्यांच्यावर होणारे हल्ले रोखण्यासाठी सरकारने " पत्रकार सुरक्षा कायदा," केला, पण या कायद्याची अमलबजावणी केली नाही. सरकारच्या उदासीनतेमुळे गेल्या काही वर्षात देशभरात हजारो पत्रकारांना आपले जीव गमवावे लागले. सरकारच्या अशा नतद्रष्टपणांमुळे आजही लाखो पत्रकार आपला जीव धोक्यात घालून पत्रकारितेचे काम करत आहेत.
साम टिव्हीचे प्रतिनिधी विकास मिरगणे हे गिरगाव चौपाटी येथे दुपारी गणेशोत्सव मिरवणुकीचे वार्तांकन करीत असतानाच गाडी पार्क करण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून सहाय्यक पोलीस निरिक्षक(एपीआय) शांताराम नाईक यांनी कारण नसताना पत्रकार विकास मिरगणे यांच्या कानशिलात लगावली. पत्रकाराला मारहाण करणे म्हणजे ही पत्रकार संरक्षण कायद्याची पायमल्लीच आहे. क्षुल्लक कारणासाठी पत्रकाराला मारहाण करून पोलीसांच्या वर्दीचा धाक दाखवणे कितपत योग्य आहे? सातपूर येथील एका युट्यूब चॅनेलच्या पत्रकाराला साध्या वादातून पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला, कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसताना एका गुंडाप्रमाणे थर्ड डिग्रीचा वापर करून पत्रकार तुषार ढेपले यास रात्रभर डांबून ठेवले.
त्र्यंबकेश्वर येथे महाकुंभ मेळ्याच्या आयोजना संबंधित साधुमहंतांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी नाशिक येथून काही पत्रकार त्र्यंबकेश्वर येथे गेले होते.त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणा-या भाविकांना टोल भरावा लागत असतो. परंतु आम्ही पत्रकार आहोत आणि साधु-महंतांच्या या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी आम्ही आलो आहोत असे सतत सांगुनही टोलनाक्यावरील वसूली कर्मचारी काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते. पत्रकार वरिष्ठांना फोन करीत असतानाच टोल वसुली करणा-या गुंडांनी या पत्रकारांना मारझोड करण्यास सुरूवात केली. या हल्ल्यात झी-24 तासचे योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजणे, अभिजित सोनावणे आणि इतर दोन पत्रकार यात जखमी झाले. पत्रकारांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत असून याची त्वरित दखल घेऊन सरकारने आता तरी पत्रकार संरक्षण कायद्याची अमलबजावणी करावी !! घर कसे चालवावे या विवंचनेत असणारा पत्रकार सध्या तणावाखाली काम करत आहे. त्यातच दिवसेंदिवस वाढणारे हल्ले माध्यम क्षेत्रासाठी चिंताजनक ठरणारे आहेत !!
- नारायण पांचाळ
जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र
मोबाईल - 9892120190

No comments:
Post a Comment