ITI च्या हजारो विद्यार्थ्यांकडून ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ITI च्या हजारो विद्यार्थ्यांकडून ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान

Share This

मुंबई - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात कौशल्य विकास विभागाच्यावतीने "स्वच्छता अभियान" राबविण्यात आले. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक संस्थांमधून हजारो विद्यार्थी एकत्र येऊन तब्बल ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात आला. या अभियानाला प्रमुख मार्गदर्शक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले तर उद्घाटन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.

या अभियानाबाबत बोलताना मंत्री लोढा म्हणाले, "विकसित भारताचा संकल्प साकार करण्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजेच स्वच्छ भारत अभियान. भारत स्वच्छ करण्याचा निर्धार आदरणीय पंतप्रधानांनी केला असून, त्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केले आहे. त्यामुळे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभागामार्फत आम्ही हा उपक्रम सुरु करत आहोत. स्वच्छता, आरोग्य या विषयांबाबत आजही जागृतीची गरज आहे आणि ती गरज या अभियानाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू."

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारताच्या निर्धाराला पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कौशल्य विकास विभागाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. भारतातील पहिली संत गाडगे बाबा स्वच्छ भारत अकादमी महाराष्ट्रात सुरु करण्यात आली असून, याद्वारे हजारो तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळत आहे. स्वच्छता आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहे हे आपण जाणतोच, पण भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाला स्वच्छ ठेवण्यासाठी गरज आहे ती जनजागृतीची आणि कुशल मनुष्यबळाची. या दोन्ही गोष्टींसाठी महाराष्ट्राचा कौशल्य विकास विभाग तत्परतेने पुढाकार घेत राहील असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages