
मुंबई - मुंबईमध्ये गेले काही दिवस पडणाऱ्या पावसामुळे डासांमुळे होणाऱ्या रोगांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मलेरिया आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली असून, याने आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या मान्सून आरोग्य अहवालानुसार मुंबई शहरात जानेवारी ते ऑगस्ट 2025 या कालावधीत, मुंबईत मलेरियाचे 5706 रुग्ण आढळले, तर मागील वर्षी याच काळात ही संख्या 4021 होती. त्याचप्रमाणे, डेंग्यूचे रुग्ण 1979 वरून 2319 वर पोहोचले आहेत. सर्वात मोठी वाढ चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये झाली असून, 210 वरून ही संख्या 485 वर पोहोचली आहे, म्हणजेच रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे.
एकीकडे या रोगांमध्ये वाढ झाली असताना, दुसरीकडे काही आजारांच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण गेल्या वर्षीच्या 553 वरून 471 पर्यंत कमी झाले आहेत. त्याचबरोबर, गॅस्ट्रोएंटेरायटिसचे रुग्ण 6,133 वरून 5,774 वर, तर कोविड-19 चे रुग्ण 1775 वरून 1111 पर्यंत खाली आले आहेत. याउलट, हेपेटायटीसच्या रुग्णांची संख्या 662 वरून 810 पर्यंत वाढली आहे.
बीएमसीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, डासांमुळे होणाऱ्या या आजारांमध्ये वाढ होणे हे मान्सूनच्या हंगामी पॅटर्ननुसार अपेक्षित आहे. ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी आणि सणांमुळे अशा रोगांचे प्रमाण वाढते. या वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी बीएमसीनेही पावले उचलली आहेत. लवकर निदान आणि उपचारांमध्ये सुधारणा करण्यासाठी 3683 वैद्यकीय व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment