उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू

Share This


उल्हासनगर - उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील गंभीर बेफिकिरी पुन्हा एकदा उघड झाली आहे. रुग्णालयाच्या शौचालयात महेश कुकरेजा (४५) या रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने शहरवासीयांमध्ये संताप उसळला आहे. समाजसेविका डॉ. रुपिंदर कौर मुरजानी यांनी स्वतः पाहणी करून ही बाब उघडकीस आणली व आरोग्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी महेश कुकरेजा यांना उपचारासाठी रुग्णालयात आणले असता ड्युटीवरील डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यास नकार दिला. डॉ. मुरजानी यांनी हस्तक्षेप केल्यावर त्यांना भरती करून घेण्यात आले. मात्र मंगळवारी त्यांची तब्येत बिघडली असताना ते शौचालयात बेशुद्धावस्थेत रक्ताने माखलेले सापडले. नातेवाईकांच्या आरोपानुसार, त्यावेळी कोणताही डॉक्टर, वार्डबॉय किंवा स्टाफ मदतीसाठी हजर नव्हता, उलट दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला.

या घटनेनंतर शहरातील सामाजिक संघटना आणि नागरिकांनी आरोग्य विभागाने तातडीने हस्तक्षेप करून रुग्णालयातील सुविधा, स्वच्छता व आपत्कालीन सेवा सुधाराव्यात, अशी मागणी केली आहे. नागरिकांचा सवाल “जीव वाचवण्यासाठी येणारे रुग्ण शौचालयात मृत्यूला का सामोरे जात आहेत?” प्रशासनासाठी धक्कादायक ठरला आहे.

रुग्णालयातील प्रमुख त्रुटी
रुग्णांना ॲडमिट करण्यास टाळाटाळ, तपासण्या वेळेवर न होणे
आपत्कालीन सेवांचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती
वार्ड व स्वच्छतेची अत्यंत दयनीय अवस्था
रक्त तपासणी अहवाल मिळण्यात सात दिवसांपर्यंतचा विलंब
रुग्णालयाची जीर्ण इमारत व पायाभूत सुविधांची दुरवस्था

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील ही घटना अत्यंत धक्कादायक व संतापजनक आहे. ही घटना अपवाद नसून, व्यवस्थात्मक अपयशाचे निदर्शक आहे. मी आरोग्यमंत्री यांच्याकडे चौकशी, दोषींवर कठोर कारवाई व रुग्णालयातील सुविधा तातडीने सुधारण्याची मागणी केली आहे, अन्यथा अशा निष्काळजीपणामुळे अजून कित्येक रुग्णांचे जीव धोक्यात जातील.
- डॉ. रुपिंदर कौर मुरजानी, तक्रारदार

सदर रुग्ण अचानक शौचालयात कोसळले. कर्मचाऱ्यांनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचार सुरू होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुःखद असून, चौकशी करून आवश्यक ती सुधारणा केली जाईल. रुग्णसेवा ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे आणि त्यासाठी आम्ही अधिक जबाबदारीने काम करू.
- डॉ. मनोहर बनसोडे, जिल्हा शल्यचिकित्सक 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages