
मुंबई (जेपीएन न्यूज) - मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन म्हणजे ‘लाईफलाईन’, मात्र या लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांच्या काळात मध्य रेल्वेवर तब्बल ५,५०,००० हून अधिक प्रवासी विनातिकीट प्रवास करताना पकडले गेले असून, त्यांच्या कडून १५४.६७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, सर्व प्रवाशांपैकी २० टक्क्यांहून अधिक प्रवासी तिकिटाशिवाय प्रवास करताना आढळले. त्यामुळे तिकीट तपासणी मोहीम अधिक कडक करण्यात आली आहे. रेल्वेच्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून, विनातिकीट प्रवासावर आळा घालण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
जुलै महिन्यात सर्वाधिक प्रवासी पकडले -
या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेने दरमहा सरासरी ९१,७९९ प्रवाशांना विनातिकीट प्रवास करताना पकडले, प्रत्येक प्रवाशाकडून सरासरी २८० रुपये दंड वसूल करण्यात आला. जुलै २०२५ मध्ये सर्वाधिक म्हणजे १४,९६७ प्रवासी तिकीटाशिवाय प्रवास करताना आढळले, आणि त्यांच्याकडून २५ दशलक्ष रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
नियम काय सांगतो? -
भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, वैध तिकीट किंवा पासशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जाते. त्यांच्याकडून पूर्ण भाडे आणि अतिरिक्त दंड आकारला जातो. हा दंड किमान ₹२५० किंवा प्रवास भाड्याच्या तिप्पट, जे जास्त असेल ते आकारले जाते.
पश्चिम रेल्वेचा विक्रम -
फक्त मध्य रेल्वेच नव्हे, तर पश्चिम रेल्वेनेही विक्रमी कारवाई केली आहे. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी एकाच दिवशी १७,३८३ प्रवासी तिकीटाशिवाय प्रवास करताना पकडले गेले, आणि त्यांच्याकडून तब्बल १.३९ कोटीं रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हा आतापर्यंतचा एकदिवसीय विक्रम मानला जात आहे.
लोकलमधील गर्दी चिंताजनक -
प्रत्येक १२ डब्यांची लोकल ट्रेन सुमारे १,२०० प्रवाशांसाठी डिझाइन केली असली, तरी गर्दीच्या वेळेत ही संख्या ४,००० पेक्षा जास्त पोहोचते. रेल्वेच्या संशोधन संस्थेने (RDSO) प्रति चौरस मीटर आठ प्रवाशांची मर्यादा निश्चित केली आहे, मात्र मुंबई लोकलमध्ये १४ ते १६ प्रवासी एका चौरस मीटरमध्ये प्रवास करत असल्याचे दिसून येते.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, “तिकीटाशिवाय प्रवास टाळा; यामुळे केवळ दंडच नाही तर लोकल व्यवस्थेवरील ताण देखील वाढतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा