
मुंबई - प्रकाशाचा सण, आनंदाचा उत्सव म्हणजे दिवाळी. दीपोत्सव साजरा करताना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे.
नागरिकांनी फटाके फोडताना पर्यावरण, ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा विचार करून संयम बाळगावा, तसेच लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाने नमूद केले आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की, “दिवाळीचा उत्सव आनंदाने साजरा करताना सुरक्षितता आणि पर्यावरण याकडे दुर्लक्ष होऊ नये. छोटीशी निष्काळजीपणाही मोठी दुर्घटना घडवू शकते.”
अग्निशमन दलाचे आवाहन -
फटाक्यांमुळे आग किंवा इतर दुर्घटना घडल्यास तात्काळ १०१ (फायर ब्रिगेड) किंवा १९१६ (नागरी मदत सेवा) या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.
फटाके फोडताना घ्यावयाची काळजी -
1. सुती कपडे परिधान करावेत.
2. फटाके फोडताना लहान मुलांसोबत मोठ्यांनी रहावे.
3. पादत्राणे वापरावीत.
4. जवळ पाण्याने भरलेली बादली ठेवावी.
5. फटाके पेटवण्यासाठी फुलबाजी/अगरबत्तीचा वापर करावा.
फटाके फोडताना टाळावयाच्या गोष्टी -
1. इमारतीत, जिन्यावर किंवा टेरेसवर फटाके फोडू नयेत.
2. लायटर किंवा आगकाडीचा वापर टाळावा.
3. झाडे, विद्युत तारा, गॅस पाईपलाइनजवळ फटाके फोडू नयेत.
4. खिडक्यांच्या पडद्याजवळ दिवे/पणत्या लावू नयेत.
5. घरातील विद्युत रोशणाईसाठी केवळ अधिकृत विद्युत तंत्रज्ञांची मदत घ्यावी.
महानगरपालिकेचा संदेश -
“दिवाळीचा सण सर्वांसाठी आनंददायी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक व्हावा, हीच आमची अपेक्षा. नागरिकांनी सुचनांचे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे,” असे मुंबई अग्निशमन दल आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन यांनी नमूद केले आहे.

No comments:
Post a Comment