
मुंबई (जेपीएन न्यूज) - दीपावली हा उत्सव आनंद, उत्साह आणि बंधुभावाचे प्रतीक असून अज्ञानाच्या अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करणारा सण आहे. संविधानाने दिलेल्या सर्वधर्मसमभाव आणि बंधुतेच्या तत्त्वांना अधोरेखित करणारा उत्सव म्हणून दीपावली साजरी करण्याचे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे.
आठवले म्हणाले, “दीपावली हा केवळ उजेडाचा सण नसून तो समाजात बंधुतेचा आणि एकतेचा संदेश देणारा उत्सव आहे. सर्व धर्म, जाती आणि पंथातील लोक एकत्र येऊन दीपोत्सव साजरा करतात, हा भारतीय संस्कृतीतील सर्वधर्मसमभावाचा सुंदर नमुना आहे.”
ते पुढे म्हणाले की, दीपावलीच्या काळात स्वदेशी वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य द्यावे आणि प्रदूषण वाढविणाऱ्या फटाक्यांऐवजी पर्यावरणपूरक सण साजरा करावा. “देशभरात आनंद, शांतता, समाधान आणि आरोग्याचा प्रकाश प्रत्येक घराघरात पसरावा, हीच या दीपावलीची शुभेच्छा,” असेही त्यांनी नमूद केले.
केंद्रीय मंत्री आठवले यांनी सर्व देशवासीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देत म्हटले की, “ही दिवाळी समाजात बंधुतेचा उजेड, एकतेची भावना आणि आनंदाचा संदेश घेऊन येवो.”

No comments:
Post a Comment