
मुंबई - मुंबई महापालिकेच्या गोरेगाव पी दक्षिण विभागात कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार पार पडला. 200 हून अधिक नागरिकांनी बांधकाम, वाहतूक, कचरा, फेरीवाले आणि सांडपाणी यांसारख्या तक्रारी नोंदवल्या. तात्काळ उपाययोजना करत मंत्री लोढा यांनी प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले.
मुंबईतील नागरिकांच्या दैनंदिन समस्यांना थेट तोडगा मिळावा, या उद्देशाने कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली गोरेगाव (प. दक्षिण विभाग कार्यालयात) जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या दरबारात आमदार विद्या ठाकूर उपस्थित होत्या.
या जनता दरबारात तब्बल २०० हून अधिक नागरिकांनी थेट आपल्या तक्रारी मंत्र्यांसमोर सादर केल्या. बांधकाम, वाहतूक, रस्त्यावरील फेरीवाले, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी आणि अवैध व्यवसाय अशा विविध तक्रारींवर तातडीने उपाययोजना करण्यात आली.
गोरेगाव परिसरातील अवैध लॉज व्यवसायामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन, या विषयावर विशेष समिती गठीत करून तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश मंत्री लोढा यांनी दिले. तसेच परिसरातील रोहिंग्या आणि बांग्लादेशी फेरीवाल्यांची ओळख पटवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, शहरातील प्रत्येक विभागात अशा जनता दरबारांचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांना थेट शासनापर्यंत पोहोचवण्याची ही एक प्रभावी यंत्रणा ठरत आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, “मुंबईकरांच्या अडचणींवर जलद आणि परिणामकारक उपाय करणे ही आमची प्राथमिकता आहे. जनता दरबार म्हणजे फक्त ऐकणं नव्हे, तर त्याच ठिकाणी निर्णय घेऊन लोकांना दिलासा देणं आहे.”
या उपक्रमाद्वारे शासनाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीला चालना मिळत असून, नागरिकांमध्ये या उपक्रमाबाबत समाधान आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा