
मुंबई - मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम (MLA Amit Satam) उद्या मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या छट पूजा (Chhath Puja) या सणाच्या प्रशासकीय तयारीचा आढावा घेणार आहेत. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात शुक्रवार दुपारी १ वाजता ही महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुंबई परिसरातील विविध छट पूजा उत्सव समितीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
देशभरात येत्या २६ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान पवित्र छट पूजेचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मुंबई परिसरातही समुद्र किनारी लाखो भाविक एकत्र येऊन सूर्य देवाची उपासना करतात. तसेच सूर्याला अर्घ्य वाहून हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या अनुषंगाने भाविकांच्या सुविधा, कायदा सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि स्वच्छतेच्या तयारीबाबत मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर या बैठीला छट पूजा समितीचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार असून, त्यांच्या सूचनांवरही विचार विनिमय होणार आहे.
कार्तिक शुक्ल चतुर्थीला छठपूजा हा सण सुरू होऊन कार्तिक शुक्ल सप्तमीला सूर्याला अर्ध्य वाहून सणाची सांगता होते. या चार दिवसाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक विविध पूजेसाठी घराबाहेर पडतात. त्यावेळी भाविकांना अनेक सुविधांची गरज भासते तसेच ठिकठिकाणी गर्दी होत असते, अशावेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे ही प्रशासनाची आणि भाविकांचीही जबाबदारी असल्याचे मंत्री लोढा यांनी म्हटले आहे. यासंदर्भात छट पूजा समितीच्या प्रतिनिधींनी या बैठकीला उपस्थित राहून, आपल्या सूचना प्रशासनापर्यंत पोहचवाव्यात असे आवाहनही मंत्री लोढा यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment