
मुंबई - कुर्ला (एल विभाग) परिसरातील जय अंबिका नगरातील नागरिकांनी पाण्याच्या टंचाईविरोधात आज भव्य ‘हंडा मोर्चा’ आंदोलन केले. पाण्यासाठी दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाचा शेवट होत नसल्याने आज शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले.
कुर्ला येथील पालिकेच्या एल विभाग कार्यालयावर संजय यल्लाळ, शिवा पानिग्रही, सुरज मिश्रा, नसरुद्दीन खान, कृष्णा व्हटकर, समीर मोमीन, उत्तम गायकवाड, हुसैन आदी लोकांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात सुमारे २५० महिला आणि १४० पुरुष सहभागी झाले होते. आंदोलन आक्रमक रूप धारण करताच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागाच्या अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला.
जय अंबिका नगरमध्ये २०१९ पासून सुमारे ८०० कुटुंबे वास्तव्यास आहेत. प्रत्येक कुटुंबाला केवळ चार हंडे पाणी मिळत असून नागरिकांना दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. रहिवाशांनी अनेकदा पालिकेला निवेदने दिली, आंदोलने केली, मात्र समस्या कायम आहे.
भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव आणि जय अंबिका सेवा मंडळाचे प्रमुख सल्लागार अशोक कांबळे यांनी सांगितले की, “आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना निवेदन दिलं, पण काहीच उपयोग झाला नाही. आजच्या आंदोलनानंतर तरी उपाय झाला नाही तर न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.”
एल विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी घटनेनंतर जल अभियंता विशाल भालेकर यांना तातडीने पाहणी करून पाण्याचा प्रेशर वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.

No comments:
Post a Comment