
मुंबई - मुंबईतील कबुतरखान्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाच्या शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेऊन कबुतरखान्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
मुंबई महानगरातील विविध ठिकाणी असणारे कबुतरखाने माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले आहेत. तसेच, कबुतरांना नियंत्रित पद्धतीने व ठराविक वेळेतच खाद्य पुरवण्याबाबत (Control Feeding) सूचना आणि हरकती मागविण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई जैन संघ संगठनचे प्रतिनिधी नितीन व्होरा, मुकेश जैन, अतुल शहा, विजय जैन तसेच अध्यात्म परिवाराचे हितेश मोटा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज (२८ ऑक्टोबर) सायंकाळी महापालिका मुख्यालयात आयुक्तांची भेट घेतली. या वेळी कबुतरांना दाणे पुरवण्यासाठी अशा जागांचा शोध घ्यावा की जिथे नागरिकांना त्रास न होता धार्मिक भावना अबाधित राहतील, अशी मागणी करण्यात आली.
यावर प्रतिसाद देताना गगराणी यांनी सांगितले की, महापालिकेकडून सर्व प्रशासकीय विभागांमध्ये अशा पर्यायी जागांचा शोध घेण्यात येईल. तसेच, सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या जागांची माहिती माननीय न्यायालयासमोर सादर केली जाईल.
महापालिकेने यापूर्वीही न्यायालयाच्या निर्देशांनुसार कबुतरखान्यांबाबतची कार्यवाही सुरू केली असून, नागरिकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेचा विचार करून संतुलित तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

No comments:
Post a Comment