“मोंथा” चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

२८ ऑक्टोबर २०२५

“मोंथा” चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा


मुंबई - बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. या वादळाच्या प्रभावामुळे अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या आसपास रेंगाळलेला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, या दोन प्रणालींच्या (बंगाल उपसागरातील चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा) एकत्रित परिणामामुळे ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहून हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

२७ ऑक्टोबरला आंध्र किनारपट्टीपासून १७० कि.मी. वर असलेले ‘मोंथा’ चक्रीवादळ २८/२९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री काकीनाडा (आंध्र प्रदेश) किनारपट्टीला ८०–८५ कि.मी. प्रतितास वेगाने धडकणार आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ ३० ऑक्टोबरला महाराष्ट्रातील नागपूर परिसरावरून पुढे जाऊन ३१ ऑक्टोबरला बिहार–पश्चिम बंगालमार्गे बांगलादेशात प्रवेश करेल.

दरम्यान, अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा ‘मोंथा’च्या प्रभावामुळे २७ ते ३० ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्र–गुजरात किनाऱ्याच्या आसपास स्थिरावलेला राहणार असून ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान गुजरातमार्गे राजस्थानकडे सरकण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषत: कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात याचा अधिक प्रभाव राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS