
मुंबई (जेपीएन न्यूज) – ज्येष्ठ नागरिकांना निवासी मालमत्ता करात ३० टक्के सवलत दिली जात असल्याचा दावा करणारा संदेश समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात फिरत असून, या संदेशामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक पालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये चौकशीसाठी गर्दी करत असल्याचे समोर आले आहे. मात्र हा संदेश पूर्णतः बनावट असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेने जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये ज्येष्ठ नागरिकांना मालमत्ता करात ३०% सवलत देण्याची कोणतीही तरतूद नाही. नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक वॉर्ड कार्यालयात येण्याचे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महापालिकेने पुढे माहिती दिली की, विद्यमान धोरणानुसार १ जानेवारी २०२२ पासून ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या निवासी मालमत्तांना करसवलत मिळते. माजी सैनिक, त्यांच्या विधवा तसेच अविवाहित शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना त्यांच्या एका मालमत्तेवर (शासकीय कर वगळून) करसवलत देण्यात येते.
शहरात सतत वाढणाऱ्या फेक मेसेजेसच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अधिकृत माहिती फक्त BMC च्या विश्वासार्ह आणि अधिकृत माध्यमांतूनच तपासण्याचे सूचित केले आहे.

No comments:
Post a Comment