मुंबईत वायुप्रदूषण, १ हजाराहून अधिक बांधकाम साईट्सवर सेन्सर्स बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत वायुप्रदूषण, १ हजाराहून अधिक बांधकाम साईट्सवर सेन्सर्स बंद

Share This
मुंबई - शहरातील वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कारवाईत सुस्तपणा असल्याचा आरोप भाजपा उपाध्यक्ष आणि मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. शहरातील १,००० हून अधिक बांधकाम प्रकल्पांवर प्रदूषण मोजणारे सेन्सर्स बंद असल्याचे महापालिकेच्या पथकाच्या निरीक्षणात आल्याचा दावा त्यांनी केला. सेन्सर्स सक्तीचे असूनही त्यांची अंमलबजावणी ढिलगिरीने होत असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

राजा म्हणाले की, “ज्या कन्स्ट्रक्शन साईट्सवर काम सुरू आहे, तिथे प्रदूषण नियंत्रणासाठी सेन्सर्स बसवणे बंधनकारक आहे. तरीही अनेक बिल्डर्सनी सेन्सर्स न बसवता नियमांचे उल्लंघन केले आहे. अशा साईट्सवर आधीच कठोर कारवाई व्हायला हवी होती. मात्र, महापालिका थेट कारवाई न करता केवळ इशारे देत आहे, ही गंभीर बाब आहे.”

मुंबईतील वायुप्रदूषणाची स्थिती झपाट्याने खालावत असून मोठ्या प्रमाणावर नागरिक श्वसनविकारांना बळी पडत असल्याचे त्यांनी नमूद केले. “मुंबईची हवा धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. तरीही प्रशासन कारवाई का करत नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महापालिका आयुक्तांनी तत्काळ हस्तक्षेप करून कठोर पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

शहरातील धूळकणांचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी बांधकाम साईट्सवर धूळरोधक जाळी, पाण्याची फवारणी आणि रिअल-टाईम प्रदूषण मॉनिटरिंग सेन्सर्स बंधनकारक करण्यात आले आहेत. मात्र नियमभंग करणाऱ्या साईट्सविरुद्ध कारवाईची गती कमी असल्याची तक्रार नागरिक आणि पर्यावरणवत्सल संस्था सातत्याने करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages