
मुंबई/ ठाणे - मुंब्रा येथील अपघाताप्रकरणी करण्यात आलेल्या आंदोलनाच्या विरोधात गुरुवारी (6नोव्हेंबर) रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली. त्यातच ठाणे स्थानकात लोकल थांबवून पुन्हा कर्जतला पाठवण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी लोकल काही काळ थांबवून ठेवली.
सायंकाळी 6.15 च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाण्यासाठी आलेली लोकल ठाणे रेल्वे स्थानकात आली. तीन क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर या लोकलची सेवा समाप्त करण्यात आली. ही लोकल पुन्हा विशेष लोकल म्हणून कर्जतला जाईल अशी घोषणा सुरू होती. एका बाजूला रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली असताना ठाणे स्थानकात लोकल थांबवून पुन्हा कर्जतला पाठवली जात असल्याने प्रवाशांनी लोकल काही काळ थांबवून ठेवली. आरपीएफ पोलीस आल्यानंतरही प्रवाशांनी लोकल काही काळ थांबवून ठेवली होती.
दोन प्रवाशांचा मृत्यू -
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी (गुरुवार 6 नोव्हेंबर 2025 रोजी) आपल्या विविध मागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन पुकारले. यात रेल्वे कर्मचारी सहभागी झाल्याने त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला. सर्वच स्थानकांवर दुपारपासून लोकलसेवा विस्कळीत झाल्याने गर्दी वाढली होती. संध्याकाळी सुमारे 6.49 वाजता रेल्वे सेवा बंद असल्याने काही प्रवासी रेल्वे ट्रॅकवरून चालत जात होते. सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ पोल क्रमांक 2/418 च्या दरम्यान एका लोकल गाडीने 5 प्रवाशांना जोरदार धडक दिली. रेल्वे प्रवासी, पोलिसांनी जखमींना जे जे रुग्णालयात हलवले. रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार 5 प्रवासी जखमी अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला होता. 2 प्रवाशांनी डामा डिस्चार्ज घेतला असून एकावर आजही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रशासनाची प्रतिक्रिया
रेल्वे प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असून प्रवाशांना रुळांवरून न चालण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून वाहतूक काही काळासाठी थांबवली होती.
मुंब्रा अपघाताच्या कारवाईविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन -
काही दिवसांपूर्वी मुंब्रामध्ये दोन रेल्वे रुळ वरखाली होऊन एकमेकांच्या अगदी जवळ आल्याने चालत्या ट्रेनमधील प्रवासी घासले गेले होते. या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू तर 9 प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली होती. या अपघाताची रेल्वे प्रशासनाकडून अंतर्गत चौकशी सुरू होती, ज्यामध्ये दोन इंजिनिअर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कर्मचाऱ्यांच्या युनियनने याला विरोध दर्शवला. इंजिनिअर विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्या विरोधात तसेच आपल्या काही मागण्यांसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनामुळे रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली होती.

No comments:
Post a Comment