
मुंबई (जेपीएन न्यूज) - कूपर रुग्णालयातील डॉक्टर्सवर हल्ल्याची घटना ताजी असतानाच आज नायर रुग्णालयातही डॉक्टर्सवर हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कूपरनंतर नायर रुग्णालयातही अशी घटना घडल्याने, मुंबईतील वैद्यकीय सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आज (११ नोव्हेंबर २०२५) रोजी पहाटे सुमारे ३:२५ वाजता ५१ वर्षीय महिला रुग्णास नायर हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टी विभागात आणण्यात आले. मात्र, तपासणीदरम्यान डॉक्टरांनी तिला दखलपूर्व मयत घोषित केले. यानंतर संतप्त नातलगांनी ड्युटीवरील डॉक्टरांना शिवीगाळ, धमक्या, धक्काबुक्की केली तसेच त्यांना भयभीत करण्याचा प्रयत्न केला. तात्काळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
घटनेची माहिती मिळताच नायर मार्डचे उपाध्यक्ष डॉ. आदित्य खारकर आणि इतर निवासी डॉक्टर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती शांत करण्याबरोबरच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना केल्या. मार्डने या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला असून अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी 'आरोग्य सेवा कर्मचारी आणि वैद्यकीय संस्था (हिंसाचार प्रतिबंध) अधिनियम' अंतर्गत संस्थात्मक FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
मार्ड अध्यक्ष डॉ. दिग्विजय जाधव यांनी आरोग्यसेवा देणाऱ्या डॉक्टरांवर वारंवार होणारे हल्ले असह्य आहेत. प्रशासनाने दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

No comments:
Post a Comment