
मुंबई (जेपीएन न्यूज) - बृहन्मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवरील अनुसूचित जातींच्या विविध रिक्त पदांची भरती तातडीने करून अनुशेष भरून काढा, तसेच पदोन्नतींसंबंधी प्रलंबित विषय त्वरित मार्गी लावावेत, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी पालिका प्रशासनाला दिले.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (१९ नोव्हेंबर २०२५) आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत महापालिकेने आर्थिक दुर्बल घटकांवर विविध योजनांतर्गत केलेला खर्च, अनुसूचित जातींसाठी उपलब्ध निधी तसेच लाड पागे समितीच्या शिफारसी आणि अनुकंपा तत्वावरील प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस आयोगाचे सदस्य सचिव गोरक्ष लोखंडे, महापालिकेचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) यतीन दळवी, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) (अतिरिक्त कार्यभार) पुरूषोत्तम माळवदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
स्वच्छता कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या आश्रय योजनांचा तसेच त्यांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्याच्या उपयोजनांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. दलित वस्त्यांमध्ये महापालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या नागरी सेवासुविधांची माहितीही आयोगासमोर सादर करण्यात आली.

No comments:
Post a Comment