
मुंबई - दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या शक्तिशाली स्फोटानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली असून, मुंबईतही तातडीने ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या या भीषण घटनेत किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक नागरिक जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
या स्फोटानंतर मुंबई पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. मुंबईसारख्या संवेदनशील आणि सामरिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरात कोणतीही संभाव्य जोखीम टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “सध्या मुंबईला कोणताही थेट धोका नाही. मात्र, आम्ही कोणतीही जोखीम पत्करू इच्छित नाही. सर्व सुरक्षा दलांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”
सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे स्टेशन, विमानतळ, मॉल्स, समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक स्थळांवर पोलिसांची वर्दी वाढवण्यात आली आहे. तसेच सर्व पोलीस युनिट्सना रात्रीची गस्त आणि पाळत अधिक कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इंटेलिजन्स ब्युरो (IB) आणि दिल्ली पोलिसांकडून मिळणाऱ्या माहितीवर मुंबईतील सुरक्षा दल सतत नजर ठेवून आहेत.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या अपुष्ट बातम्या किंवा अफवा सोशल मीडियावर शेअर न करण्याचे आवाहन केले आहे.

No comments:
Post a Comment