डॉक्टर महिलेच्या मृत्यूवर राज्यभर संताप - रुग्णसेवा ठप्प, डॉक्टर संघटनांचे आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉक्टर महिलेच्या मृत्यूवर राज्यभर संताप - रुग्णसेवा ठप्प, डॉक्टर संघटनांचे आंदोलन

Share This

मुंबई - सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या संशयास्पद मृत्यूनंतर राज्यभरातील डॉक्टर संघटना एकवटल्या असून निष्पक्ष चौकशी व डॉक्टर सुरक्षेच्या मागणीसाठी आज राज्यव्यापी आंदोलन सुरू झाले आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह सर्व प्रमुख शहरांतील शासकीय आणि पालिका रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी कामबंद आंदोलन छेडले आहे.

मुंबईतील नायर, सायन, कूपर आदी प्रमुख रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. रुग्णालय परिसरात हातात पोस्टर घेऊन “नो सेफ्टी, नो सर्विस”, “बेटी पढ़ी, पर बची नहीं” अशा घोषणांसह डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत. रुग्णसेवा ठप्प झाल्याने रुग्णांना मोठा फटका बसला असून प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांकडून तात्पुरत्या स्वरूपात सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

२३ ऑक्टोबर रोजी फलटण येथील हॉटेलमध्ये या महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने तळहातावर सुसाईड नोट लिहून दोन व्यक्तींवर — पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदणे आणि प्रशांत बनकर — शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. या दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र, डॉक्टरवर वैद्यकीय अहवाल बदलण्यासाठी पोलिस आणि एका माजी खासदाराकडून दबाव टाकला जात होता, असे आरोपही समोर आले आहेत.

डॉक्टर संघटनांच्या प्रमुख मागण्या —
* मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबाला ५ कोटींची आर्थिक मदत मिळावी

* प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी

* डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात

छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातही मार्ड संघटनेने कामबंद आंदोलन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व ओपीडी व इतर विभाग बंद ठेवण्यात आले आहेत. या आंदोलनामुळे राज्यातील रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, शासनाने तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रातून होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages