
मुंबई - बृहन्मुंबई महापालिकेतील चतुर्थश्रेणी रोजंदारी, बहुउद्देशीय व कंत्राटी कामगारांसाठी महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. बोनसविषयक प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आला असून, पुढील 8/10 दिवसांत बोनस मिळेल असे महापालिका प्रशासनाकडून प्रथितयश आश्वासन देण्यात आले आहे.
यासोबतच, कामगार विभागाच्या परिपत्रक क्रमांक प्रकाअ/06 (सन 2022-23), दिनांक 19 जानेवारी 2024 नुसार लागू असलेला 49.58% लेव्ही महापालिकेकडून लागू करण्यात येणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्र. रु.) यांच्या आदेशानुसार परिचारिका, तंत्रज्ञ, औषधनिर्माता यांसह अन्य कर्मचाऱ्यांना 15 भरपगारी रजा देण्यात येतात. मात्र ‘अन्य’ या वर्गात चतुर्थश्रेणी कामगारांचा स्पष्ट समावेश नसल्याने लेखा अधिकाऱ्यांनी हरकत नोंदवली होती.
या हरकतीवर म्युनिसिपल मजदूर युनियनने पाठपुरावा केला असून, परिपत्रकातील त्रुटी दुरुस्त करून चतुर्थश्रेणी रोजंदारी, बहुउद्देशीय व कंत्राटी कामगारांनाही 15 भरपगारी रजा मंजूर करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
कामगारांच्या समान हक्काच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असून, महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे.
म्युनिसिपल मजदूर युनियनचे सह सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले की, “कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी आमचा लढा सुरूच आहे. बोनस आणि रजा या दोन्ही बाबतीत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, लवकरच अंतिम आदेश अपेक्षित आहेत.”
कामगार जगतात या घडामोडींमुळे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

No comments:
Post a Comment