
मुंबई (जेपीएन न्यूज) - मुंबईतील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) सातत्याने खराब श्रेणीत राहू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर शहराची हवा इतकी खराब असेल तर या वॉर्ड-टीम्स नेमक्या काय करत आहेत? असा प्रश्न मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते आणि मुंबई भाजपा उपाध्यक्ष रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईत थंडी सुरू होताच हवेची गुणवत्ता AQI ने “वाईट” पातळी गाठली असून हवेतील प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास वाढल्याची नोंद रुग्णालयांकडूनही होत आहे. महापालिका प्रशासनाने बांधकामांमुळे होणारे धूळप्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक वॉर्डात विशेष टीम तयार केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्ष परिस्थितीत हवा सुधारत नसल्याने या टीम्सच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर रवी राजा यांनी महापालिका प्रशासनावर तीव्र टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी विचारले आहे की, “शहराची हवा इतकी खराब असेल तर या वॉर्ड-टीम्स नेमक्या काय करत आहेत? बिल्डर्सकडून होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी महापालिका ठोस कारवाई करणार की नाही?”
रवी राजा यांनी पुढे म्हटले आहे की, बांधकाम प्रकल्पांवरून मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे मुंबईकरांना श्वसनाचे आणि इतर आरोग्यविषयक त्रास सहन करावे लागत आहेत.
मुंबई महापालिकेने अद्याप या आरोपांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र शहरातील वाढते प्रदूषण पाहता बांधकाम प्रकल्पांवरील देखरेख आणि कठोर अंमलबजावणीची मागणी अधिक तीव्र होत जाण्याची शक्यता आहे.

No comments:
Post a Comment