
सातारा- कोकणात सहलीसाठी गेलेल्या नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या बसला नाशिकला जाताना पुणे-बंगळूरू महामार्गावर कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला. महामार्गावर काम सुरू असलेल्या सहलीची बस भराव पुलावरून कोसळून बसमधील 40 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यात चार विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. जखमींना कराडच्या कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नाशिकच्या निफाडमधील बी. पी. महाविद्यालयाचे विद्यार्थी सहलीसाठी कोकणात गेले होते. कोकणातून सातारामार्गे नाशिकला परत जात असताना पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे बसचा अपघात झाला. वाठार (ता. कराड) गावच्या हद्दीत भराव पुलाचे काम सुरू आहे. पहाटे अंधार होता. त्यामुळे बस चालकाला रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न आल्याने बस भराव पुलावरून खाली कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालक भयभीत झाले. अपघाताची माहिती घेण्यासाठी पालक कराड पोलिसांशी संपर्क साधत होते.
40 हून अधिक विद्यार्थी जखमी, 4 गंभीर...
या अपघातात बस मधील 40 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील 4विद्यार्थी गंभीररित्या जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सर्व जखमी विद्यार्थ्यांना कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच कराड ग्रामीण आणि महामार्ग मदत केंद्राच्या पोिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाठार ग्रामस्थांनी पोलिसांना मदत केली.
सर्व विद्यार्थी निफाडच्या महाविद्यालयाचे...
या अपघातात एकूण 42 विद्यार्थी जखमी आहेत. त्यापैकी 10 जणांना वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आणि 32 जणांना कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. 4 विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हे सर्व विद्यार्थी निफाडमधील बी. पी. महाविद्यालयाचे आहेत. दरम्यान, मुली देखील सहलीला गेल्या होत्या. सुदैवाने त्यांची दुसरी बस होती. त्यामुळे त्या सुरक्षित आहेत.

No comments:
Post a Comment