
मुंबई - घाटकोपरमधील नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला ‘घाटकोपर लायन्स महानगरपालिका जलतरण तलाव व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ प्रकल्प तब्बल सहा वर्षांपासून रखडला असून या कामाला गती देण्यासाठी माजी नगरसेविका व गटनेत्या, मुंबई महापालिका राखी जाधव यांच्या पुढाकाराने सोमवारी एन विभाग कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.
घाटकोपर पूर्व येथील क्रीडापटूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रस्ताव 2017 मध्ये तत्कालीन नगरसेविका राखी जाधव यांनी मांडला होता. आयुक्त अजॉय मेहता यांनी हा प्रस्ताव मंजूर करून एक कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला होता. मात्र 2018 पासून बंद असलेला ओडियन स्विमिंग पूल पुनर्बांधणीअभावी अद्याप सुरू होऊ शकलेला नाही. त्यामुळे नागरिक, क्रीडाप्रेमी तरुण आणि ज्येष्ठ नागरिक सातत्याने मागणी करत आहेत.
स्विमिंग पूल व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे ज्येष्ठांसाठी विरंगुळा, मध्यमवयीनांसाठी उपचारात्मक थेरपी तसेच मुलांच्या क्रीडा विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे नागरिकांनी बैठकीत अधोरेखित केले. “एका पिढीचे तारुण्य या तलावाच्या प्रतिक्षेतच गेले,” अशी मनाला भिडणारी व्यथा क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली.
नागरिकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून संबंधित कागदपत्रे नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आली आहेत. मात्र, कामाची गती अत्यंत मंद असल्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्त डॉ. गजानन बेल्लाळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रलंबित अडचणी आणि पुढील कार्यवाही यावर सविस्तर चर्चा झाली.
राखी जाधव यांनी यावेळी घाटकोपरमधील विविध क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या सूचनांचा विचार करूनच जलतरण तलाव व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची उभारणी व्हावी, अशी मागणी केली. प्रकल्पातील प्रलंबित मुद्द्यांवर मनपाला आवश्यक सूचना पाठवून कामाला गती देण्यासाठी पुढील पाठपुरावा करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
घाटकोपरकरांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा महत्त्वाचा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा, अशी एकमुखी अपेक्षा बैठकीतून व्यक्त झाली.

No comments:
Post a Comment