
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने अलीकडेच जारी केलेल्या परिपत्रकानुसार के.ई.एम., सायन (लो.टी.एम.सी.), नायर रुग्णालय आणि नायर दंत रुग्णालयातील स्थापत्य व यांत्रिकी-विद्युत विभागातील सहाय्यक अभियंत्यांना उपनगरीय रुग्णालयांच्या तांत्रिक कामांची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निर्णयाला मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे.
युनियनचे सरचिटणीस यशवंत धुरी यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, या प्रमुख रुग्णालयांमध्ये तांत्रिक कामांचा व्याप आधीच मोठा असून, उपलब्ध मानवी संसाधन मर्यादित आहे. अतिरिक्त जबाबदारीमुळे रुग्णालयांतील दुरुस्ती, देखभाल आणि अत्यावश्यक तांत्रिक सेवांमध्ये खोळंबा व विलंब होण्याची शक्यता आहे. उपनगरीय रुग्णालयांतील अभियंता पदांतील रिक्त जागांबाबत प्रथम नगर अभियंता व प्रमुख अभियंता यांच्याकडे प्रस्ताव पाठवला गेला असता तर ही स्थिती टाळता आली असती. कोणतीही पूर्व चर्चा न करता प्रमुख रुग्णालयांतील अभियंत्यांना बाहेरील कामे देणे अयोग्य व अन्यायकारक असल्याचे युनियनचे मत आहे.
युनियनने पुढे अशी मागणी केली आहे की, उपनगरीय रुग्णालयांमधील तांत्रिक कामांसाठी स्वतंत्र सहाय्यक अभियंत्यांची नियुक्ती करावी. प्रमुख रुग्णालयांतील अभियंत्यांवर टाकलेली अतिरिक्त भाराची जबाबदारी तात्काळ मागे घ्यावी आणि संबंधित परिपत्रक रद्द करावे. या प्रकरणाकडे पालिका प्रशासन गांभीर्याने पाहत असून, तांत्रिक कर्मचारी तुटवडा आणि रुग्णालयीन सेवा सुरळीत ठेवण्यासाठी लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

No comments:
Post a Comment