
मुंबई - सुभाषनगर स्वास्थ प्रसूती गृह, नाहूर येथील कर्मचारी वर्गावर पर्यवेक्षक अनुराधा कचरे या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक अत्याचार, अयोग्य वागणूक आणि अपमानास्पद भाषेमुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत म्युनिसिपल मजूर युनियन, मुंबई यांनी लेखी तक्रार नोंदवून संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्याची मागणी केली आहे.
युनियनचे सहायक सरचिटणीस शैलेश खानविलकर, प्रदीप नारकर, संतोष कांबळी, महेश दळवी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, प्रसूतीगृहातील कर्मचारी वर्गाशी पर्यवेक्षक कचरे या सातत्याने गैरवर्तन करत असून, कर्मचाऱ्यांचा अपमान, ताणतणाव निर्माण करणे, कामाच्या ठिकाणी अवमानकारक भाषेचा वापर, वरिष्ठांकडे चुकीच्या तक्रारी करून दडपण आणणे असे प्रकार वाढीस लागले आहेत.
युनियनच्या म्हणण्यानुसार, या वर्तनामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून रुग्णसेवेलाही बाधा पोहोचत आहे. काही कर्मचारी तणावामुळे रजेवर जाण्याची वेळ आली असल्याचेही युनियनने सांगितले.
याशिवाय, रुग्णालयातील कामकाजात अडथळे निर्माण होऊन सेवागुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
परिस्थितीचा तातडीने विचार करून संबंधित पर्यवेक्षकाची बदली करावी, तसेच रुग्णालयातील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी युनियनने केली आहे. या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सोमवार, ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. युनियनने याबाबतचे प्रत निवेदन सहाय्यक आयुक्त, मनपा आरोग्य विभाग तसेच भांडुप पोलीस स्टेशन यांनाही पाठवले आहे.

No comments:
Post a Comment