रेल्वेकडून बनावट तिकीटविरुद्ध मोहीम वेगात, फसवेगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वेकडून बनावट तिकीटविरुद्ध मोहीम वेगात, फसवेगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई

Share This

मुंबई - अलीकडच्या काळात बनावट, किंवा खोट्या रेल्वे तिकिटांच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेने संयुक्तपणे अंमलबजावणीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. उपनगरी मार्गावर तिकीट तपासणी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत असून, विशेष पथके स्थानकांवर तसेच गाड्यांमध्ये तैनात केली जाणार आहेत.

प्रवाशांकडून ओळखपत्राची मागणी - 
वाढीव तपासणीचा भाग म्हणून प्रवाशांकडे वैध ओळखपत्र बाळगणे आणि तिकीट तपासणाऱ्यास दाखवणे आवश्यक आहे. प्रवाशाने दाखवलेल्या सिझन तिकिटावरील माहिती व ओळखपत्रातील तपशील यांची सांगड जुळली पाहिजे.

बनावट तिकीट तयार करणाऱ्यांना किंवा वापरणाऱ्यांना इशारा - 
बनावट तिकिटांच्या निर्मिती किंवा वापरात सहभागी असणाऱ्यांवर रेल्वे प्रशासन कठोर भूमिका घेत आहे. अशा कुठल्याही फसव्या मार्गांचा अवलंब करू नये, असा स्पष्ट इशारा रेल्वेकडून देण्यात आला आहे.

कठोर शिक्षेच्या तरतुदी - 
अपराध्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(२), ३३६(३), ३३६(४), ३४०(१), ३४०(२) आणि ३/५ अंतर्गत कारवाई केली जाईल. यात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे इत्यादी गुन्हे समाविष्ट असून दोषींना दंडासह सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.

अधिकृत साधनातूनच तिकिट खरेदीचे आवाहन - 
प्रवाशांनी केवळ अधिकृत विक्रेते, रेल्वे स्थानकांवरील बुकिंग काऊंटर किंवा एटीव्हीएममधूनच वैध तिकिटे घेण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे. प्रवासी आपल्या मोबाईलवर ‘UTS Mobile App’ डाउनलोड करूनही तिकिट खरेदी करू शकतात.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages