लग्नाचे वय नसले तरी लिव्ह-इनमध्ये राहता येणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लग्नाचे वय नसले तरी लिव्ह-इनमध्ये राहता येणार

Share This

 

जयपूर - लग्नाचे वय पूर्ण झाले नसले तरी दोन प्रौढ व्यक्तींना परस्पर संमतीने लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा पूर्ण अधिकार आहे असा ऐतिहासिक निर्णय राजस्थान हायकोर्टाने दिला आहे. भारतात महिलांसाठी विवाहयोग्य वय १८ वर्षे आणि पुरुषांसाठी २१ वर्षे असले, तरी १८ वर्षांपासून व्यक्तीला कायद्यानुसार प्रौढ मानले जाते.

न्यायमूर्ती अनुप ढांड यांनी हा निकाल दिला आहे. हा निर्णय कोटा येथील १८ वर्षीय तरुणी आणि १९ वर्षीय युवकाने दाखल केलेल्या संरक्षण याचिकेच्या संदर्भात देण्यात आला. दोघांनीही हायकोर्टात अर्ज करताना सांगितले की, त्यांनी परस्पर संमतीने लिव-इन रिलेशनशिप स्वीकारली आहे आणि त्यांच्या जीवाला धोका असल्याने पोलिस संरक्षणाची गरज आहे.

जोडप्याने २७ ऑक्टोबर २०२५ रोजी औपचारिक लिव्ह-इन करार केला होता. मात्र याला मुलीच्या कुटुंबीयांनी जोरदार विरोध केला आणि दोघांना ठार मारण्याची धमकीही दिली, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. कोटा पोलिसांकडे लेखी तक्रार दिल्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्याचे जोडप्याने न्यायालयात सांगितले. 

राज्याच्या वतीने हजर असलेले सरकारी वकिल विवेक चौधरी यांनी असा दावा केला की, मुलगा २१ वर्षांचा नसल्याने तो कायदेशीररीत्या विवाह करू शकत नाही आणि म्हणूनच त्याला लिव्ह-इनमध्ये राहण्याचा अधिकार देऊ नये. मात्र हायकोर्टाने हा युक्तिवाद धुडकावून लावला. 

न्यायालयाने स्पष्ट सांगितले की, संविधानाच्या कलम २१ अंतर्गत प्रत्येक नागरिकाला जीवन जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार मिळालेला आहे आणि कोणीही हा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. या कलमाचा भंग म्हणजे थेट संविधानाचा भंग मानला जाईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages