
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा दिल्यानंतरही स्मारक उभारण्यास इतका उशीर का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, मुंबई कार्याध्यक्षा राखी जाधव यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
चैत्यभूमीवरील कार्यक्रमानंतर बोलताना सुप्रिया सुळे यांनी इंदू मिल येथील आंबेडकर स्मारकाच्या कामातील विलंबावर राज्य सरकारला धारेवर धरले. “इंदू मिलची जागा दिल्यानंतरही स्मारक उभारण्यास इतका उशीर का? राज्यातील मोठे रस्ते-इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प वेगात सुरू आहेत, पण आपल्या श्रद्धेचं स्थान असलेलं हे स्मारक अद्याप अपूर्ण आहे. राज्य सरकारने याचे उत्तर द्यावे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
राज्यातील गुन्हेगारीत वाढ -
राज्यात वाढत्या गुन्हेगारीबाबतही त्यांनी सरकारवर टीका केली. “डबल इंजिन सरकार असूनही केंद्र सरकारची आकडेवारी सांगते की महिलांवरील गुन्ह्यात वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील महिला असुरक्षित आहेत, राज्यातील गुन्हेगारी वाढत आहे—हे मी विरोधक म्हणून नव्हे तर केंद्राची आकडेवारी सांगते,” असे त्यांनी म्हटले.
इंडिगो एअरलाईन्सवर कारवाई करा -
इंडिगो एअरलाईन्सच्या विस्कळीत सेवांबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी केंद्र सरकारकडून कठोर कारवाईची मागणी केली. “हजारो प्रवाशांना दोन दिवसांत मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. आधी कोणतीही सूचना न देता एवढा विस्कळीतपणा निर्माण झाला; कोट्यवधी रुपये आणि वेळ वाया गेला. इंडिगोवर तातडीने कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
तसेच विमानवाहतूक क्षेत्रात ग्राहकांना पर्याय मिळावेत यासाठी इंडिगोसारख्या आणखी पाच कंपन्या निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. “इंडिगोची सेवा अचानक विस्कळीत का झाली, त्यामागील कारणे आणि उपाय काय—याची माहिती केंद्र सरकारने संसदेत स्पष्टपणे मांडली पाहिजे,” असेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.

No comments:
Post a Comment