मुंबईतील दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव द्या - नरेंद्र जाधव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईतील दादर मेट्रो स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव द्या - नरेंद्र जाधव

Share This


मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांनी मुंबईतील दादर मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी असे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला सत्ताधारी व विरोधकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.  

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्ताने दादरच्या चैत्यभूमीवर मोठा जनसागर उसळला आहे. अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांनी आज चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दादर मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी असे नाव देण्याची मागणी केली. 

नरेंद्र जाधव म्हणाले, आज चैत्यभूमीवर अफाट जनसागर उसळला आहे. जवळपास १५ ते २० लाख लोक येतील असे सांगण्यात येत आहे. चैत्यभूमीवर पुस्तकांचे प्रदर्शनही भरले आहे. तिथे ४ कोटी रुपयांची पुस्तक विक्री होण्याचा अंदाज आहे. अनुयायी अत्यंत शिस्तबद्धपणे येऊन बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत. मुंबई महापालिकेनेही उत्तम नियोजन केले आहे. पालिकेने बाबासाहेबांवरील एक पुस्तिकाही प्रकाशित केली आहे. येथे चांगली सेवा दिली जात आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदू मिल स्मारकाचे काम मार्गी लावण्यासाठी तत्काळ एक समन्वय समिती नेमावी. तसेच दादर मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी असे नाव द्यावे. मी संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या वतीने ही मागणी करतो.

सुप्रिया सुळे, चित्रा वाघ यांनी केले समर्थन - 
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र जाधव यांच्या मागणीचे समर्थन केले आहे. दादर स्थानकाचे नामांतर व्हावे अशी आमची अनेक वर्षांची मागणी आहे, असे त्या म्हणाल्या. भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनीही बाबासाहेबांना अभिवादन केले. मी दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्यभूमीवर आले. बाबासाहेबांमुळेच आमचे अस्तित्व आहे. त्यांचे आमच्यावर कोटी कोटी उपकार आहेत. नरेंद्र जाधव यांच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक विचार करतील, असे त्या म्हणाल्या.

दादर रेल्वे स्थानकाला डॉ. आंबेडकर यांचे नाव द्या - 
विशेष म्हणजे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. त्यासाठी गेले काही वर्षे पाठपुरावा सुरु असून भीम आर्मीने वेळोवेळी आंदोलन केले आहे. आजही भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करत सरकारचे नामांतराकडे लक्ष वेधले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages