पन्नास खोके, एकदम ओकेच्या घोषणांनी महापालिकेची पहिलीच सभा गाजली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 February 2026

पन्नास खोके, एकदम ओकेच्या घोषणांनी महापालिकेची पहिलीच सभा गाजली


मुंबई - मुंबई महानगरपालिकाच्या नव्या कार्यकाळातील पहिलीच विशेष सभा जोरदार घोषणाबाजी आणि राजकीय चुरशीने गाजली. सभागृहनेते व विरोधी पक्षनेते यांच्या अधिकृत घोषणेनंतर शिवसेनेच्या गटनेत्यांची घोषणा होताच  विरोधी बाकांवरून झालेल्या घोषणांमुळे काही काळ वातावरण तापले होते. अखेर महापौर रितू तावडे यांनी हस्तक्षेप करत कामकाज सुरळीत पार पाडण्याचे आवाहन केले.

सभागृहनेते, विरोधी पक्षनेते पदाची घोषणा - 
सभेत सभागृहनेतेपदी गणेश खणकर तर विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सत्ताधारी भाजपकडून गटनेते म्हणून निवड झालेल्या खणकर यांच्या नावाची सभागृहनेतेपदासाठी शिफारस करण्यात आली होती. तर उबाठा पक्षाकडून गटनेतेपदी निवड झालेल्या पेडणेकर यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली. याशिवाय शिवसेनेकडून अमेय घोले, काँग्रेसकडून अश्रफ आझमी, मनसेकडून यशवंत किल्लेदार आणि एमआयएमकडून विजय उबाळे यांच्या गटनेतेपदाचीही अधिकृत घोषणा करण्यात आली.

पन्नास खोके, एकदम ओकेच्या घोषणा - 
दरम्यान, शिवसेनेच्या अमेय घोले यांच्या नावाची गटनेते म्हणून घोषणा होताच उबाठा गटाकडून “पन्नास खोके, एकदम ओके” अशा घोषणा देण्यात आल्या. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी हरकत घेत सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडण्याचे आवाहन केले. वारंवार घोषणाबाजी होत असल्यास “खिचडीपासून डेडबॅगपर्यंत सर्व विषय बाहेर काढू” असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतरही घोषणाबाजी सुरूच राहिल्याने दोन्ही बाजूंनी प्रत्युत्तरात्मक घोषणा देण्यात आल्या.

राजकारण तापणार - 
या गोंधळानंतर महापौर रितू तावडे यांनी सदस्यांना समज देत सभागृहाचे कामकाज शांततेत व नियमांनुसार पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. नव्या कार्यकाळातील पहिल्याच सभेत निर्माण झालेल्या या गोंधळामुळे आगामी काळात महापालिकेतील राजकारण अधिक तापण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS