अग्निशमन दल कर्मचाऱ्यांना तीन वर्षाने मिळणार शिलाई भत्ता - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 January 2018

अग्निशमन दल कर्मचाऱ्यांना तीन वर्षाने मिळणार शिलाई भत्ता


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना गेल्या तीन वर्षात गणवेश शिलाईसाठी ठरवून देण्यात आलेली रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. अधिकारी, कर्मचाऱ्यांना २०१५ - १६ मधील शिलाईसाठीची ६३ लाख ९३ हजार ५१८ रुपये इतकी रक्कम वेतनातून देता यावी म्हणून तब्बल तीन वर्षांनी स्थायी समितीत प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी मिळाल्यास ही रक्कम जवान व अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना आपत्कालीन आपत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य असा गणवेश घालावा लागतो. त्याप्रमाणे अग्निशमन अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना दररोज परिधान करावा लागणार गणवेश दरवर्षी तर संचलनाच्यावेळी परिधान करावयाचा गणवेश तीन वर्षाने देण्यात येतो. गणवेश शिवून घेण्याकरिता कापड देण्यात येते. गणवेश शिवून घेण्याकरिता लागणारी शिलाईची रक्कम कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनातून देण्यात येते. मुंबई अग्निशमन दलाच्या आस्थापनेवर ३९९३ अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी २३१३ कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना २०१५ - १६ या कालावधीत गणवेश शिवून घेण्याकरिता कापड वितरित करण्यात आले होते. २०१५ - १६ मध्ये गणवेश शिवून घेण्यासाठी कमीत कमी २५४१ रुपयांपासून ५७५३ रुपयांपर्यंत इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना एकूण ६३ लाख ९३ हजार ५१८ रुपये इतकी रक्कम वेतनाद्वारे देणे आवश्यक होते. यामध्ये दररोज परिधान करावयाच्या गणवेशासाठी ४३ लाख ४३ हजार ६५३ रुपये तर संचलानाच्यावेळी परिधान करावयाच्या गणवेशासाठी २० लाख ४९ हजार ८६५ रुपये या रक्कमेचा समावेश आहे. २०१५ - १६ साली अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शिवून घेतलेल्या गणवेशासाठी ६३ लाख ९३ हजार ५१८ रुपये इतकी रक्कम अद्याप वेतनाद्वारे अद्याप देण्यात आलेली नाही. शिलाईची रक्कम कर्मचारी अधिकाऱ्यांना वेतनाद्वारे देण्यासाठी स्थायी समितीची मंजूरी आवश्यक असल्याने तसा प्रस्ताव मंजूरीसाठी सादर करण्यात आला आहे. २०१५ - १६ चा शिलाईसाठी रक्कम मंजूर करण्याचा प्रस्ताव तब्बल तीन वर्षांनंतर स्थायी समितीकडे मंजुरीसाठी पाठवल्याने अग्निशमन दल प्रशासन व पालिका प्रशासनाला स्थायी समिती सदस्य कोंडीत पकडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post Bottom Ad