भीमा कोरेगांव प्रकरणी विधिमंडळावर २८ फेब्रुवारीला विराट मोर्चा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 January 2018

भीमा कोरेगांव प्रकरणी विधिमंडळावर २८ फेब्रुवारीला विराट मोर्चा


मुंबई । प्रतिनिधी - भीमा कोरेगांव हल्ल्याला जबाबदार असलेल्या सूत्रधारांवर कारवाई न करता महाराष्ट्र बंद मध्ये उस्फुर्तपणे सहभागी झालेल्या आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. या खोट्या केसेस तात्काळ मागे घेण्यात याव्यात यासाठी संविधान परिवाराच्यावतीने विधिमंडळावर २८ फेब्रुवारीला विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे नेते मनोज संसारे यांनी दिली.

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनोज संसारे बोलत होते. यावेळी त्यांच्यासह पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, रिपब्लिकन जनशक्तीचे नेते अर्जुन डांगळे, रिपाई ( एकतावादी)चे नेते नानासाहेब इंदिसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना संघ परिवार आणि शासनाने जे आंबेडकरी जनतेवर अत्याचार सत्र चालविले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आणि शासन पुरस्कृत दहशतवाद संपविण्यासाठी चेंबूर येथे आंबेडकरी व पुरोगामी चळवळीतील विविध पक्ष संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत संविधान परिवार या सामाजिक संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले.

संघ परिवार व भाजपच्या शासनाकडून देशभरात संविधानावर आणि पुरोगामी आंबेडकर चळवळीवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात निर्धारपूर्वक उभे राहण्याचा या बैठकीत निर्णय झाला आहे. याचाच एक भाग म्हणून २६ जानेवारीला कूपरेज मैदान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया येथे सर्वपक्षीय संविधान रॅली होणार असून या रॅलीत संविधान परिवारातील सर्व संघटना सहभागी होणार असल्याचे कवाडे यांनी सांगितले. संविधान परिवाराच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. संविधान परिवारात इतरही पक्ष, संघटना आणि नेत्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कवाडे यांनी केले.

आंबेडकर, आठवलेंना बाजूला ठेवून ऐक्य - 
रिपब्लीकन ऐक्याचा प्रश्न नेहमीच उपेक्षित केला जातो. पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न उपस्थित केला असता प्रकाश आंबेडकर हे कोणाचे ऐकत नाहीत आणि रामदास आठवले हे मनुवाद्यांचे गुलाम बनले आहे. यामुळे आंबेडकर आणि आठवले या दोघांना बाजूला ठेवून रिपब्लिकन ऐक्य केले जाणार असल्याचे मनोज संसारे यांनी सांगितले.

Post Bottom Ad